डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम रयतक्रांती महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करीत डोंबिवली विधानसभा १४३ मतदार संघासाठी उमेवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी अर्ज स्वीकारला. यावेळी महापौर विनिता राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.
राज्यमंत्री चव्हाण यांनी आयोजित केलेल्या रॅलीला पश्चिमकडील सम्राट चौकातील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयातून महायुतीच्या रॅलीला गुरुवारी सकाळी सुरूवात झाली. ढोल-ताशे, बँडपथक निनादाने परिसर दणाणून गेला होता. ‘रवींद्र चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे दिसून येत होते. भाजप, सेना, रिपाई यांचे झेंडे चौकाचौकात फडकाविले गेले. रॅलीत आमदार निरंजन डावखरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, नगरसेवक राहुल दामले, विकास म्हात्रे, नितीन पाटील, नगरसेविका मनीषा धात्रक, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, संजय पावशे, भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, प्रज्ञेश प्रभूघाटे, किशोर मानकामे, कविता गावंड, मंगला सुळे, किरण मोंडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सकाळपासूनच शहरातील विविध भागातून कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होत होती. यामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता. सम्राटचौक मार्गे निघालेली रॅली द्वारका चौक, महात्मा गांधी रोडवरील साहित्यिक पु.भा. भावे सभागृह आणि पुर्वेकडील श्री गणेश मंदिर मार्गे फडके रोडवरून कल्याण डोंबिवली डोंबिवली विभागीय कार्यालयातील 144 डोंबिवली विधानसभा निवडणूक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांच्या कार्यालयाकडे दाखल झाली. त्यानंतर चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.