कल्याण प्रतिनिधी (संतोष पडवळ) ता १०, : टिटवाळा परिसरात येणाऱ्या मांडा पश्चिम भागात वासुंद्री गावाच्या नदीत चार जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास घडली. मांडा पश्चिम परिसरात असणाऱ्या जानकी विद्यालय येथील ओमकारेश्वर सदन चाळ या ठिकाणी राहणारे चार तरूण दुर्गा देवीच्या विसर्जनाकरिता गेले होते. या देवीचे विसर्जन करताना ते चौघं ही नदीच्या पाण्यातील प्रवाहात वाहून गेले.
मांडा टिटवाळा येथील ओमकारेश्वर सदन तरूण मंडळाकडून नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. यंदा देखील दुर्गामातेची मुर्ती स्थापन करण्यात आली होती. या देवीचे विसर्जन वासुंद्रीच्या नदीच्या पात्रात करण्यात आले. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास या देवीचे विसर्जन करण्यास चार तरूण पाण्यात उतरले मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुर्ती त्यांच्या अंगावर पडली. यामुळे त्यांचा तोल गेल्याने ते पाण्यात बुडून वाहत गेले. रुपेश पवार (२३), विश्वास पवार (२४), सिद्धेश पार्टे (२४) आणि सुमित वायदंडे (२५) असे नदीत वाहून गेलेल्या तरूणांचे नाव आहे.
टिटवाळा पोलिसांकडून मध्यरात्री घडनास्थळी पोहोचत शोधकार्य चालू होते. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही. या घटनेमुळे परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.