अंबरनाथ दि. ११ (नवाज अब्दूलसत्तार वणू) अंबरनाथमधील रिपाई सेक्युलर गटाचे समर्थन मिळवण्यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे प्रयत्न यशस्वी झाले आहे. रिपाई सेक्युलरचे शाम गायकवाड यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रोहित साळवे यांना आपले समर्थन दर्शविले आहेत.
अंबरनाथ शहरामध्ये रिपाई सेक्युलरची ताकद आपल्याकडे ओढण्याची चढाओढ वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची सुरू होती. मात्र रिपाई सेक्युलरने या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका निवडणुकीत सेक्युलर ही राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक रिंगणात उतरली होती. आता प्रथमच सेक्युलर गट हे काँग्रेस सोबत जोडले गेले आहे. अंबरनाथमधील इंद्राभवन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात समर्थन जाहीर केले आहे.
अंबरनाथ येथे काँग्रेस-राष्ट्रवादी रिपाई सेक्युलर, रिपाई कवाडे गटाचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सर्वच नेत्यांनी “आमदार बालाजी किणीकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली ही नाराजी मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. गेल्या १० वर्षात अंबरनाथ मतदार संघात एकही लक्षणीय काम न करणाऱ्या किणीकर यांना घराचा रास्ता दाखवा” असे आवाहन यावेळी करण्यात आले. या मेळाव्याला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप नाना पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, रिपाई सेक्युलर चे प्रमुख श्याम गायकवाड, कबीर गायकवाड, ऍड. यशवंत जोशी, उल्हासनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राधाचरण करोतीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.