डोंबिवली ( शंकर जाधव ) .प्रचारासाठी अवघा आठवडा भराचा कालावधी उरला असून सर्वच राजकीय पक्षांनी मातब्बर नेते प्रचार रिंगनात उतरवले आहेत. उद्या मंगळवारी १५ तारखेला कल्याण पूर्वेत भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी ,मनोज तिवारी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तर डोंबिवलीत राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे .
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने महायुती करत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले .तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी मनसे वंचित आघाडीने देखील दंड थोपटले आहेत .कल्याण डोंबिवली मधील कल्याण ग्रामीण ,कल्याण पूर्व,कल्याण पश्चिम, डोंबिवली या चार ही मतदारसंघात चुरशीच्या लढती दिसून येत आहे. २१ तारखेला मतदान असून शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबणार असल्याने अवघे पाच दिवस प्रचारासाठी उरले आहेत .उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारानी वैयक्तिक भेटी गाठी,सोसायटी मीटिंग,बैठका, मेळावे ,सोशल मीडियाच्या अशा विविध माध्यमातून प्रचाराचा धुराळा उडवला आहे .हाती अवघे पाच दिवस उरल्याने शिवसेना,भाजप , कोंग्रेस ,राष्ट्रवादी ,मनसेचे मातब्बर नेते मतदारसंघात प्रचारार्थ हजेरी लावणार आहे .उद्या सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कल्याण पूर्वचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश तरे याच्या प्रचारार्थ सभेसाठी येणार आहेत .डोंबिवली येथील डीएनसी मैदानात सायंकाळी सहा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचार सभेस हजेरी लावणार आहेत .कल्याण पूर्वे मतदारसंघात उत्तर भारतीय मतांचे वर्चस्व पाहता या मतदारांना आकर्षित करण्यासाठी उद्या भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी , मनोज तिवारी या मतदारसंघात हजेरी लावणार आहेत.