सिंधुदुर्ग: अखेर आज नारायण राणे यांनी त्यांचा स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पार्टित विलीन केली आणि जाहीररीत्या भाजपावासी झाले आहेत. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कणकवलीत सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर प्रत्यक्ष टीका करणे टाळले.
नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांना शिवसेनेच्या सतीश सावंत यांनी आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे, सावंत हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळं आजच्या सभेत मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधात बोलणार का, याविषयी उत्सुकता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जाहीर टीका करण्याचं टाळलं. आपल्या उमेदवाराचा दणदणीत विजय होईल. विरोधी उमेदवार चारीमुंड्या चीत होतील, इतकंच ते म्हणाले. ‘आजच्या दिवसाकडं अनेकांचं लक्ष होतं. राणेंचा प्रवेश सिंधुदुर्गातच व्हावा, असा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा आग्रह होता. त्यानुसारच हा कार्यक्रम होत आहे. कणकवलीत ज्या पद्धतीनं सगळे एकत्र आलेत. ते पाहता विचलित होण्याची अजिबात गरज नाही. आपला विजय निश्चित आहे. त्यामुळं आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. अनेक लोक आपल्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. पण, त्याकडं दुर्लक्ष करा. प्रेमानं आणि शांततेनं लढा. जिंकणाऱ्या लोकांनी वाघासारखं राहायचं असतं,’ असा टोलाही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना लगावला. भाजप सरकारनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या विकासकामांचा पाढाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.