कल्याण ग्रामीणमधून मनसेच्या उमेदवार प्रमोद (राजू ) पाटील विजयी
डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसे उमेदवार प्रमोद ( राजू ) पाटील आणि युतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यात काटे कि टक्कर` झाली. राजु पाटील यांनी ७ हजार १३२ मतांनी आघाडी घेतली. तर महायुतीच्या रमेश म्हात्रे यांना देखील शहरी भागातील मतदारांनी कौल दिला होता. अखेर राजु पाटील हे महाराष्ट्रातील मनसे पक्षाचे एकमेव विजयी उमेदवार ठरले. त्यानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर मनसैनिकांनी मोठा जल्लोष केला. निवडणुक जिंकल्यानंतर राजु पाटील यांनी ही निवडणुक ठाणे विरूध्द राजु पाटील अशी असल्याची प्रतिक्रीया दिली.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून राजु पाटील यांनी मतांची आघाडी घ्यायला सुरूवात केली. त्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह पहावयास मिळत होता. राजु पाटील यांच्या पारड्यात ९३ हजार ९२७ मते पडली तर महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांना ८६ हजार ७७३ मते मिळाली. पहिल्या पाच फेरीपर्यंत राजु पाटील यांनी ४ हजार मतांची आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर रमेश म्हात्रे यांनी सहाव्या फेरीपासून ८८० मतांची आघाडी घेत राजु पाटील यांच्यावर मात केली. हे लक्षात येताच शिवसैनिकांनी मतदान केंद्राच्या गेटसमोर जोरदार जल्लोषबाजी सुरू केली. त्यानंतर दोन ते चार हजार मतांच्या फरकाने २० व्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे कायमच पुढे होते. त्यामुळे रमेश म्हात्रे या विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून निवडून येतील असे वाटत असतानाच नाट्यमय रित्या कलाटणी मिळाली. २१ व्या फेरीनंतर मनसेचे राजु पाटील यांची मते वाढत गेली आणि महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांची मते कमी होत गेली. यावेळी मनसैनिकांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. २९ व्या फेरीनंतर व्हीव्ही पॅटची मोजणी करण्यास सुरूवात झाली. वंचितचे उमेदवार अमोल केंद्रे आणि नोटा यांना मिळून जवळपास ६ हजार २०० मते मिळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जवळपास ६ हजार ९२ नागरिकांनी कोणताही उमेदवार नको असा कौल दिला होता.