जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी यांनी केला सयुक्त दौरा
ठाणे दि 5 नोव्हेंबर : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून न जाता येणाऱ्या रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी संयुक्तपणे मुरबाड, शहापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांचा दौरा केला. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. या दौऱ्यावर असणाऱ्या सर्व क्षेत्रीय यंत्रणांना युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दोघांनी दिले.
यामध्ये मुरबाड तालुक्यातील पोटगाव, किशोर , शिवळे, तर शहापूर येथील शिवाजीनगर, बेडीस, सापगाव आदी गावांना भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शहापूर तालुक्यातील शिलोत्तर गावामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, शहापूर गट विकास अधिकारी श्री. भवारे, मुरबाड गट विकास अधिकारी विष्णू केळकर उपस्थित होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली टेंभुरली गावाला भेट
याच बरोबर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांनी आज शहापूर तालुक्याचा दौरा केला. येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या टेंभुरली गावातील भातशेतीची त्यांनी पाहणी केली.