डोंबिवली ( शंकर जाधव ) दिवाळीच्या सणात डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या गटात दोन हाणामारी झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वायवॉकवर शिवीगाळ देण्याच्या क्षुल्लक कारणावरून तिघांवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारेकऱ्यांना अटक केली आहे.या घटनेत जखमी झालेल्यांवर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. स्वायवॉकवर ही दुसरी घटना असून काही महिन्यापूर्वी पालिका अभियंता सुभाष पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी ब्लेडने वार केले होते.
अनिकेत दत्ता म्हात्रे,यशंवत हरिश्चंद्र मराठे आणि साहिल श्रीनिवास ठाकूर असे अटक केलेल्या मारेकऱ्यांचे नाव असून ते डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा परिसरात राहतात.रामनगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,सिद्धार्थनगर येथील अनिल सुधांशु, मिलिंद घोलप आणि विकास नवले यांच्यावर अटक आरोपींनी डोंबिवलीतील स्वायवॉकवर शिवीगाळ देण्याच्या क्षुल्लक कारणावरून तिघांवर चाकूने वार केले. अटक आरोपींवर १४७,१४८,१४९ ( सार्वजनिक ठिकाणी धारदार हत्यार बाळगणे), ३२० ( गंभीर दुखापत ) आणि ३०७ ( जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ) कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तर मारेकऱ्यांबरोबर असलेला गौरव म्हात्रे यांचा रामनगर पोलीस शोध घेत आहे. गौरव म्हात्रेवर यापूर्वी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सुरेश आहेर यांनी दिली.दरम्यान डोंबिवलीत असे प्रकार वाढत असून लवकरच पोलिसांनी या सर्व घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात मोठे घटना नाही यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. डोंबिवली शहरात कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यास आणि जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी `वॉच` ठेवून कडक करवाई करावी अशी मागणी डोंबिवलीकरांकडून केली जात आहे.