ठाणे

जिल्हा शासकीय रुग्णालय अतिदक्षता विभाग बनलाय धोकादायक

*घाणीने रुग्ण त्रस्त * खिडक्यांवर लटकलेल्या विजेच्या जिवघेण्या तारा

ठाणे, [ प्रतिनिधी ] दि. 14  :  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री झाल्यावर ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजेच सिव्हील हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज करण्याची घोषणा केली होती. मात्र हॉस्पिटल सुसज्ज करण्याचे तर सोडाच तेथे असलेल्या घाणीमुळे आणि लटकलेल्या विजेच्या तारांमुळे रुग्ण तसेच नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. चक्क अति दक्षता विभागातच उघड्या विद्युत डिपींमुळे रुग्णांना विजेचा झटका बसून मोठी जिवीतहानी होण्याची भीती अमलगस फॅसिलीटी सर्व्हीस सेंटरचे अक्षय कोळी यांनी निदर्शनास आणली. कोळी यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सिव्हील रुग्णालयातील स्वच्छता मोहिम राबविली त्यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात ‘अति दक्षता विभाग’ फलक लिहिलेल्या ठिकाणीच विजेच्या डिपी उघड्या आहेत तर त्याच्या अवतीभोवती लटकलेल्या विद्युत तारांना एखाद्या रुग्णाचा हात लागल्यास जिवीतहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एवढेच नव्हे तर अतिदक्षता विभागातील इमारतीच्या आजूबाजूच्या खिडक्यांमध्येही विद्युत तारा लटकताना दिसत आहेत. या विद्युत तारांना एखाद्या रुग्ण किंवा वावरणार्‍या मुलांना हात लागल्यास जिवतहानी होण्याची भीती दक्ष नागरिक अक्षय कोळी यांनी निदर्शनास आणली आहे. सदर ठिकाणी असलेल्या खिडक्यांच्या बाहेर व बाकडयांच्या आजूबाजूलाही प्रचंड घाण, कचरा पडलेला दिसत आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यासही धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाण्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार संजय केळकर यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठा गाजावाजा करीत  सदर रुग्णालयाचे सुसज्ज रुग्णालयात रुपांतर करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी रुग्णालयाची पाहणीही करण्यात आली होती. यापूर्वी सदर रुग्णालयातील प्रसुती विभागातील एका रुममधील प्लास्टरही अनेकदा कोसळले होते. त्यामुळे बाळंतीण महिलांना आपले बाळ घेवून रुग्णालयाच्या वर्‍हांडयात रात्र काढावी लागली होती. अनेकदा रुग्णालयात बाळ चोरीच्या घटना घडल्या आहेत तर चक्क रुग्णालयाच्या काउंटरवरच डल्ला मारला होता.
सिव्हील रुग्णालयातील दुरवस्थेबाबत अमलगस फॅसिलीटी सर्व्हीस सेंटरचे अक्षय कोळी हे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी करणार आहेत.

PHOTO GALLERY

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!