अंबरनाथ दि. १५ (नवाज अब्दूलसत्तार वणू) अंबरनाथच्या पूर्व विभागात होणारा अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात त्वरित सुधारणा न केल्यास महालक्ष्मीनगरमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी दिला आहे.
पूर्वेकडील महालक्ष्मीनगर, श्रीकृष्णनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध तसेच पिवळा रंग असलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार रणझुंजार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. गुरुवारी काँग्रेस शहराध्यक्ष व गटनेते प्रदीप नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अंबरनाथ शहराच्या पूर्व विभागात होणाऱ्या दूषित पाण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारून लेखी निवेदन दिले.
दूषित पाण्यामुळे साथीचे रोग होण्याची भीती असून घसा खवखवणे, उलट्या होण्यासारखे विकार बळावले असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिला. यावेळी नगरसेवक पंकज पाटील, रणझुंजार संघटनेचे अध्यक्ष विश्वास नलावडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.