डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहाजवळ अनधिकृत इमारतीवर गुरुवारी सकाळी पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. मात्र ही कारवाई दिखाव्याची असल्याचे दिसून आले. २४ तास उलटतहि नाही तोवर बिल्डरने पुन्हा या इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेने या बांधकामाकडे लक्ष न देता डोळ्यावर पट्टी बांधली असल्याचे नागरिक बोलत आहेत. या बिल्डरवर पोलीस ठाण्यात एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही. पालिकेने अश्या बिल्डरांना एकप्रकारे पाठबळ दिल्याची चर्चा शहरात सुरु आहे.पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सदर अनधिकृत इमारती स्वतः उभे राहून पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जमीनदोस्त करून घेण्याची मागणी होत आहे.
तीन महिन्यात बिल्डरने तळ अधिक चार मजली इमारत बांधली होती. याची तक्रार भाजप नगरसेवक शैलेश धात्रक, समाजसेविका प्रियांका कार्लेकर आणि मनसे गटनेते मंदार हळबे यांनी केली होती.काही नागरिकांनीहि या इमारतीच्या बांधकामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. यावर गुरुवारी `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे, `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. जेसीबीने फक्त इमारतीच्या समोरील काही मजले तोडण्यात आले. मात्र इमारत जमीनदोस्त करण्याचे धाडस पालिका प्रशासनाने दाखवले नाही. पुन्हा त्या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे पाहून नागरिकांनी पालिकेच्या कारवाईबाबत शंका व्यक्त केली आहे.अनधिकृत बांधकामावर सुरु असताना पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला जात नाही. तसेच स्थानिक पोलीसही या बिल्डरवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करत नाही. त्यामुळे अश्या बिल्डरांवर पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांना विचारले असता इमारतीवर बांधकामावर पालिकेने कारवाई केले असून बांधकाम साहित्य जप्त केले आहे.