डोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या महिन्यात खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंच लीलाबाई पाटील यांनी राजीनामा दिल्याने आज शुक्रवारी सरपंच पदाची निवड करण्यासाठी पोट निवडणुक घेण्यात आली. यावेळी खोणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या भारती फराड निवडून आल्या असून त्यांनी योगेश ठाकरे यांचा पराभव केला. यावेळी झालेल्या निवडणुकीत योगेश ठाकरे यांना ४ मते मिळाली तर भाजपच्या भारती फराड यांना ६ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या.या पंचायतीत एकुण ११ सदस्य असून १० जणांनी मतदानाचा हक्क बजावला तर एक सदस्याने मात्र गैरहजर राहण्यास पसंती दिली. यावेळी यांनी निवडणुक निर्णय अधिकारी विक्रम चव्हाण म्हणून काम पाहिले असून पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये ही निवडणुक पार पडली.
खोणी गावाच्या आसापासचा परिसर विकासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा असल्याने खोणी गावातील निवडणुक कायमच प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येईल याकडे साºया पंचक्रोशीचे लक्ष लागलेले असते. तिसऱ्यादा राष्ट्रवादीचा पराभव झाला असून ही लढाई केवळ भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमध्येच पार पडली. भाजपकडे ७ सदस्य होते. तर राष्ट्रवादीकडे ४ सदस्य होते. प्रत्यक्षात मात्र भाजपचे ६ सदस्य उपस्थित होते तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य असल्याने भाजपचा विजय झाला आहे. मात्र केवळ खोणी गावाचा विकास करायचा असून कोणत्याही प्रकारे राजकारण करायचे नसल्याचे माजी सरपंच हनुमान ठोंबरे यांनी सांगितले. रविंद्र चव्हाण यांनी देखील या निवडणुकीत लक्ष घातल्याबद्दल त्यांचे आभारही यावेळी ठोंबरे यांनी मानले. सत्तासंघर्ष करून ही निवडणुक जिंकली असून ठाणे जिल्ह्यात गावाचे नाव मोठे करण्याचे स्वप्न असल्याचे ठोंबरे यांनी नमुद केले. यावेळी भाजप नगरसेविका डॉ.सुनिता पाटील, छगन पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र पाटील, ग्रामीण सरचिटणीस लक्ष्मण पाटील उपस्थित होते.