डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील पु.भा.भावे सभागृहाजवळ उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर राजरोजपणे पालिका प्रशासनाच्या नाकावर टीच्चून तीन महिन्यापासून अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु होते.या इमारतीच्या बांधकामाच्या पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी आल्या होत्या. परंतु पालिका प्रशासन या इमारतीवर का कारवाई करत नाही असा प्रश्न सर्वाना पडला होता. विविध वृत्तपत्रात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच झोपेचे झोंग घेतलेल्या पालिकेने इमारतीवर सुरुवातीला दिखाव्याची कारवाई केली. मात्र नागरिकांच्या तक्रारी आणि नाराजीचा सूर आल्याने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी लक्ष देऊन इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले त्यानुसार शुक्रवारी दुपारी पालिका प्रशासनाने सदर इमारत पाडण्यास सुरुवात केली.
अगदी रस्त्याच्या बाजूला नजरेला येईल अशी ही अनधिकृत इमारती बांधताना बिल्डरला पालिका प्रशासन आपल्यावर कारवाई करील अशी भीती वाटत नव्हती. या इमारतीच्या बांधकामाबाबत अनेक नागरिकांनी पालिकेच्या `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयात लेखी तक्रारी केल्या होत्या.तक्रारी वाढत असल्याने पालिकेने काही दिवसांपूर्वी इमारतीवर दिखाव्याची कारवाई केली.परंतु सदर अनधिकृत इमारत जमीनदोस्त केली नव्हती.इमारत पूर्णपणे का पाडली जात नाही असा प्रश्न नागरिकांनी पडला होता.शुक्रवारी पालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी , `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे,`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे आणि `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यासंह पालिकेच्या कर्मचार्यांनी कडक पोलीस बंदोबस्तात एक पोखलन आणि एक जेसीबीच्या साहय्याने सदर इमारत जमीनदोस्त केली. पालिकेची कारवाई सुरु असताना नागरिकांनी गर्दी केली होती. उशिरा का होईना पालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी या अनधिकृत इमारतीवर कारवाई केल्याबद्दल नागरिकांनी पालिकेचे कौतुक केले. दरम्यान डोंबिवलीतील सुरु असलेल्या अनेक अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीकर करत आहेत.