ठाणे

दिवा डंपिंग ग्राऊंडच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी प्रचंड मोर्चा  काढू ; माजी आमदार सुभाष भोईर यांचा इशारा

दिवा  : दिवा येथील स.नं.७९ व मौजे साबे येथील स.नं.३७,३८, ५७,५८,५९,६०,६१,७२ व मौजे देसाई येथील स.नं. २२३,२२४, आणि मौजे डावले येथील स.नं.२११, २१२ येथील भूखंडावर डंपिंग ग्राऊंडचे आरक्षण टाकण्यात आले आहे.यामुळे दिवा, साबे, शिळ, देसाई व डावले परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दिव्यातील डंपिग ग्राऊंडचे आरक्षण रद्द करून व सुरु असलेले डंपिग ग्राऊंड बंद करण्याची मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी महापौर व आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. सदर आरक्षण रद्द न केल्यास डंपिंगच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी व सुरु असलेले डंपिंग बंद करण्यासाठी नागरिकांच्या वतीने प्रचंड मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यातील खाजगी जागेवर ठाणे शहरातील सुमारे ७५० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. या अनधिकृत डंपिंग मुळे दुर्गंधी पसरत असून त्याचा नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. येथील कचऱ्याला वारंवार आगी लागत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदरचे डंपिंग हटवण्या संबधी सातत्याने मागणी व पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच अधिवेशन काळामध्ये दिव्यातील अनधिकृत डंपिग हटविण्याकरिता औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष देखील वेधले आहे. मात्र तरीही दिवा डंपिंग  हटविण्यासंबंधी राज्य शासन अथवा महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.ठाणे महानगरपालिकेच्या या बेकायदेशीर डम्पिंगचा त्रास परिसरातील दिवा, साबे, खार्डी, शिळ, आगासन, दातिवली, देसाई या गावांना होत आहेत. दिवा डम्पिंग बंद करण्याबाबत दिवा विभागातील नागरिकांनी आंदोलन केले होते त्यावेळी दिवा डम्पिंग तातडीने बंद करण्याचे आश्वासन ठाणे महानगरपालिकेने दिले होते. मात्र अद्यापही दिवा डम्पिंग बेकायदेशीरपणे सुरु आहे. दिवा डम्पिंगमुळे दिवा, साबे, शिळ, आगासन, दातिवली, खार्डी विभागात विविध आजार पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या डम्पिंगमुळे खारफुटीला धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. या विभागातील खारफुटी नष्ट झाली आहे. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिवा ग्रामस्थांसोबत झालेल्या  बैठकीत डंपिंग हटविण्याची एकमताने मागणी करण्यात आली. मात्र महापालिका प्रशासनाने सदर डंपिंग हटविण्या ऐवजी रहिवास व हरित विभागाचे असलेले आरक्षण बदलून घनकचरा व्यवस्थापन असे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव तयार करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत असताना दिवा शहराचा विकास करण्याऐवजी भकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका बाजूने ठाण्याचा विकास होत असताना दिवा शहरावर कचऱ्याचे आरक्षण टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असेल तर दिवेकर तसेच शिळ, देसाई, डावले विभागातील नागरिक प्रशासनाचा जाहीर धिक्कार करीत आहेत. ठाणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट ठाणे शहरामाध्येच लावण्यात यावी असेही त्यांचे म्हणणे आहे. अनधिकृत डंपिग ग्राऊंड मुळे दिवा वासीयांच्या भावना अतिशय तीव्र असून अधिकृत केल्यास डंपिग ग्राऊंडच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी तसेच सुरु असलेले डंपिंग बंद करण्यासाठी नागरिकांच्या वतीने प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराच माजी आमदार सुभाष भोईर यांनी दिला आहे. त्याचबरोबर या विभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांनी देखील आरक्षणाच्या विरोधात सहभाग नोंदवून महापालिकेत आवाज उठवून प्रस्तावाला विरोध करावा असे आवाहन माजी आमदार सुभाष भोईर यांनी केले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!