मुंबई : महाराष्ट्रातील सत्तापेचाचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत आहे.आज ग्रँड हयात हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले.यावेळी १६२ पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते.
बहुमत चाचणी संदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालय उद्या (२६ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनण्याविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यादरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन केले. तिन्ही प्रमुख पक्ष आणि अपक्ष १६२ आमदारांची मुंबईतील ग्रँड हयातमध्ये ओळखपरेड करण्यात आली आहे.यावेळी आमदारांना संविधान दिनानिमित्त शपथ देण्यात आली.
दरम्यान परडेच्या नावाखाली महाविकास आघाडीचं हे शक्तीप्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे.सोफिटेल हॉटेलमधून राष्ट्रवादीचे आमदार, जे डब्ल्यू मॅरिएटमधून काँग्रेसचे आमदार आणि लेमन ट्री हॉटेलमधून शिवसेनेचे आमदार हयात हॉटेलमध्ये आले होते. याद्वारे भाजप आणि जनतेला आपलं संख्याबळ दाखवण्यात आले.
तत्पुर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय आणि आमच्याकडे १६२ संख्याबळ असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार ग्रँड हयातमध्ये ठीक सात वाजता एकत्र आपण पाहू शकाल, असंही राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे सात वाजता प्रथमच हे तिन्ही पक्षांचे आमदार एकत्र पाहायला मिळाले .