डोंबिवली : २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेला होत असलेला विलंब आणि मुलभूत नागरी सुविधा न देता ग्रामपंचायतीतील मालमत्तांना कोणतेही निकष न लावता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून १० पटीने मालमत्ता कर वाढवून दिल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षिय युवा मोर्चा व काटई ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक ०१/१२/२०१९ रोजी श्री गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरात काटई ग्रामस्थांची छोटेखानी बैठक संपन्न झाली.
या बैठकीत ग्रामस्थांनी भ्रष्ट आणि नियोजनशून्य कडोंमपा प्रशासनाविरोधात एक ठराव सर्वानूमते पास केला तो म्हणजे ,२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिका गठीत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दिनांक ०७ सप्टेंबर २०१५ रोजी अध्यादेश प्रसिद्ध केल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून येथील गावात मूलभूत नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत,शाळा व आरोग्य केंद्र महापालिकेत वर्ग केले जात नाही,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम केले जात नाही पण येथील मालमत्तांना मात्र १० पटीने कर आकारणी केली जात आहे.याचे निषेधार्थ,जोपर्यंत २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा विषय शासन तसेच न्यायालयीन दरबारी प्रलंबीत आहे तोपर्यंत येथील मालमत्तांना ग्रामपंचायतीप्रमाणे कर आकारणी करावी.
ग्रामस्थांची सदरील मागणी मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर लोकशाही मार्गाने धडक मोर्चाचे आयोजन केले जाईल असेही यावेळी जाहिर करण्यात आले.