* १० वीची परीक्षा देऊ न शकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवरील संकट झालं दूर; पालकांनी मानले आभार!
अंबरनाथ दि. १० (नवाज अब्दुलसत्तार वणू) अंबरनाथच्या गुरुकुल शाळेत फी न भरल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना १० वीची परीक्षा देता येणार नव्हती. मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ म्हणून पत्रकार आणि राजकारण्यांनी एकत्र येत हा प्रश्न सोडवला आणि शाळेनंही त्यांना मोलाची साथ दिली.
गुरुकुल ग्रँड युनियन शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा शिक्षणहक्क कायद्यानुसार शिकण्याचा प्रस्ताव दोन वर्षांनी फेटाळण्यात आला. मात्र पालकांची परिस्थिती नसल्यानं ते फी भरू शकले नाहीत, आणि शेवटी शाळा सोडल्याचा दाखला नसल्याच्या तांत्रिक कारणामुळे हे विद्यार्थी १० वीच्या परीक्षेला बसू शकणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. ही बाब समजताच अंबरनाथमधील पत्रकार आणि स्वीकृत नगरसेवक पंकज पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील, मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष धनंजय गुरव या सर्वांनी मिळून शाळेकडे पाठपुरावा केला. सरतेशेवटी शाळेनं अर्धी फी माफ केली, तर उर्वरित अर्धी फी भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली. तसेच या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देत बोर्डाकडे स्वतःचा वकील देत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळवून देण्याची जबाबदारीही घेतली. या सगळ्यानंतर ज्या मुलांवर हे संकट ओढावलं होतं, त्यांच्या पालकांनी अंबरनाथ तालुका पत्रकार संघात येऊन अध्यक्ष पंकज पाटील यांचे आभार मानले. सोबतच काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील, मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष धनंजय गुरव यांचेही पालकांनी आभार मानले.