डोंबिवली ( शंकर जाधव ): दिवा वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकावरील सकाळी गर्दीच्या वेळी पावणे सहा नंतर थेट सव्वा दहा वाजता ट्रेन असल्याने चाकरमान्यांचे हाल होत होते याबाबत दिवा वसई या दिवसेदिवस गर्दी वाढणाऱ्या मार्गावर शटल ऐवजी लोकल सेवा चालवण्यात यावी तसेच या मार्गावरील फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अधिवेशनात केली.
दिवा वसई या मार्गावर रेल्वे कडून मेमू गाड्या चालविल्या जात असून दिवसभरात केवळ चार गाड्या या मार्गावर धावतात. सकाळी ५ वाजून ४४ मिनिटानी पहिली गाडी गेल्यानंतर १० वाजून १४ मिनिटानी या मार्गावर दुसरी गाडी येते यानंतर दुपारी १२.३० वाजता तिसरी गाडी धावते. यामुळे कामावर जाण्यासाठी सकाळी १०.१४ वाजताची गाडी पकडण्याखेरीज प्रवाशांना पर्याय नसतो साहजिकच या गाडीत प्रवेश करण्यासाठी अप्पर कोपर स्थानकात प्रवाशाची अक्षरशा गर्दी उसळते . जीवाची तमा न बाळगता प्रवासी या गाडीत चढण्यासाठी धडपड करतात यातून अनेकदा अपघात होतात. मात्र एक गाडी चुकल्या नंतर दुसरी गाडी नसल्यामुळे प्रवासी लटकत प्रवास करत असल्याचे वृत्त माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आज खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अधिवेशनात या मार्गावर धावणाऱ्या शटल ऐवजी दिवा ते वसई या मार्गावर लोकल चालविल्या जाव्यात तसेच या लोकलच्या सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत फेर्या वाढवाव्यात अशी मागणी केली आहे.
दिवा वसई मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवा…खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी
