कामा आणि प्रदुषमंडळाचे प्रयत्न सुरूच
डोंबिवली ( शंकर जाधव ) काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा आणि भोईरवाडी या परिसराला लागूनच असणाऱ्या नाल्यातून दुर्गंधी येत असल्याच्या अनेक तक्रारी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि कल्याण – अंबरनाथ मॅन्युफॅक्च्यरिंग असोशिएशनला (कामा) परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि कामा संस्थेने रहिवासी परिसरातील अंतर्गत गटारातून वाहणारे कंपन्यांचे सांडपाणी बंद केले आहे. या परिसरातील गटाराला एका बाजुने बंधारा घातला असून दुसऱ्या बाजुच्या गटारातून कंपनीच्या रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले जाते असे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले.
या परिसरात राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रसायनाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसी परिसराला लागूनच खंबाळपाडा आणि भोईरवाडी हा परिसर आहे. या परिसराच्या बाजुनेच एक नाला वाहतो. या नाल्यातून कंपनीचे रासायनिक पाणी वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांना रसायनांच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. त्यानंतर कामा संघटना आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाने या जागेची पहाणी केल्यानंतर अंतर्गत गटारातून वाहणाऱ्या रासायनिक पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचे दिसले. रस्त्याच्या भूमीगत असणाऱ्या गटारातून खाडीला मिळणारे रासायनिक पाण्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी या गटाराच्या तोंडाशी रेती टाकून बंधारा घातला. तर मुळ गटारातून पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी एक पंप आणि चेंबर बांधून तात्पुरती व्यवस्था केली आहे. या पंपातून पाणी चेंबर मध्ये खेचले जाते. त्यानंतर प्रक्रिया प्रकल्प केंद्राकडे सोडले जाते अशी माहिती कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली. यामुळे या परिसरातील दुर्गंधीला आळा बसला असून चेंबरमधील रासायनिक पाण्याचा निचराही व्यवस्थीतपणे केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या ठिकाणी पंप बसवला आहे त्या ठिकाणी रोज रात्री दोन ते कर्मचाऱ्यांची नेमणुक केली असून चेंबर भरले की हा पंप थोड्या वेळासाठी बंद केला जातो. या चेंबरमधील पाणी कमी झाले की पुन्हा पंप सुरू केला जात असल्याचे तंत्र त्यांनी यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले. सध्यस्थितीत ही व्यवस्था तात्पुरती स्वरुपाची असली तरी कायमस्वरूपी यावर मार्ग काढावा यासाठी एमआयडीसीला प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी सांगितले.