* राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह अनेक संघटनांनी दिला पाठींबा
* अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातीचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काढला भव्य निषेध मोर्चा
* मोर्च्यांत हजारोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव; पोलिसांचा कडक बंदोबस्त
अंबरनाथ दि. २० (नवाज अब्दुलसत्तार वणू)
‘‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयका’’ला अलीकडेच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली असून आता त्याचे रुपांतर ‘’नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियमा’’त झालेले आहे. हा कायदा संसदेत मंजूर झाल्यापासून देशभरात सर्वत्रच याचा विरोध होताना दिसून येत आहे, केंद्र सरकारने भारतीय संविधानाच्या व मुस्लिमांच्या विरोधात “एनआरसी व कॅब” हे विधेयक मंजूर केल्याने या विधेयकाच्या विरोधात आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातीचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शांततेत अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर “भव्य निषेध मोर्चा” काढण्यात आला होता. हा मोर्चा अंबरनाथ पश्चिमेकडील हजरत गैबन शाह वली दर्गाह येथून सुरुवात झाली, त्यानंतर तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार संभाजी शेलार व सुहास सावंत यांना लेखी निवेदन देण्यात आले. या मोर्च्यांत हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांसह सर्वधमिय लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः शुक्रवारचा दिवस असल्याने नमाज पठण करण्याकरिता आलेले सर्व मुस्लिम बांधव हे आज एका ठिकाणी आले होते.

या मोर्च्यांला राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, ब्लॉक काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे, आरपीआय सेक्युलरचे श्याम गायकवाड, नगरसेवक उमेश पाटील, मिलिंद पाटील, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, मराठा सेवा संघ, जमीतूल उलम्मा हिंद अंबरनाथ आदींनी पाठींबा देत सहभागी झाले होते. तर या मोर्च्यांत मुस्लिम जमातीचे युसूफ कासम शेख, रईस खान, आरिफ काजी, असलम शेख, सिकंदर कुरेशी, समाजसेवक अब्दुलसत्तार वणू, बिस्मिला शेख, नईम शेख यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
लोकशाहीच्या मार्गाने आजचा मोर्चा काढण्यात आलेला असून ‘’नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियम” हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा पुढील मोर्चा हा स्त्री-पुरुष असा मिळून भव्य स्वरूपात काढण्यात येईल. असा इशाराही मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी सलीम चौधरी यांनी दिला आहे.