नवी मुंबई

नवी मुंबईत डॉक्टरांच्या सुरांनी गाजवली मैफल

नवी मुंबई : नेहमी रुग्ण आणि रुग्णालयात गंभीर मुद्रा आणि तणावात वावरणारे डॉक्टर ..गळ्यात स्टेथोस्कोप घेऊन रुग्णांची नाडी तपासणारे डॉक्टर रविवारी मात्र वेगळ्याच रुपात बघायला मिळाले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला..

हातात स्टेथोस्कोप ऐवजी माईक घेऊन गाणारे, गाता गाता श्रोत्यांमध्ये मिसळून त्यांच्या सोबत नाचले तेव्हा आवाज या खास डॉक्टरांच्या या आर्केस्ट्राने रोटरी क्लब ने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांची मने जिंकली.
नवी मुंबईतील रोटरी क्लब(हिल साईड)ने रुग्णांच्या मदतीसाठी निधी गोळा करायला आवाज या संगीत रजनीचे आयोजन केले होते.
खरे तर डॉक्टर्सनी उपचार करायचा आणि रुग्णांनी त्यासाठी पैशाची जमवाजमव करायची अश्या सध्याच्या वातावरणात स्वतः डॉक्टर्सनी समाजसेवी प्रकल्प आणि उपचारासाठी निधी गोळा करायला पुढाकार घेतला. डी. वाय. पाटील रुग्णालयात क्रीडा वैद्यकीय विज्ञान( Sports Medicine)चे प्रमुख डॉ. भूषण पाटील यांच्या संकल्पनेतून ‘आवाज’ हा खास डॉक्टर्सचा आर्केस्ट्रा तयार झाला.
यात गायन, मिमिक्री, शिटीच्या माध्यमातून गायन, वादन सारे काही डॉक्टर्स करतात!

बेलापूर येथील वारकरी भवनात रविवारी संध्याकाळी आयोजित कार्यक्रमात ही संगीत रजनी चांगलीच रंगली. डॉ. भूषण पाटील यांचा सुरेल स्वर आणि उत्तम सादरीकरण यामुळं उपस्थितांनी वय, पद विसरून विविध गाण्यांवर ताल धरत सभागृहात नृत्य केले. पाटील यांच्या पल पल दिल के पास, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर या गीतांना श्रोत्यांनी डोक्यावर घेतले. ऐरोलीतील प्रसिध्द चर्मरोग तज्ञ आणि नाट्यलेखक डॉ. प्रणित फरांदे यांनी खुमासदार सूत्रसंचालन, हास्यकल्लोळ निर्माण करणारी मिमिक्री आणि गीत गायन करून या मैफलीला एक वेगळीच उंची मिळवून दिली. डॉ. फरांदे यांच्या अष्टपैलूत्वाला सभागृहाने उत्तम दाद दिली. कांद्याच्या किमती गगनाला भिडल्याबद्दल त्यांनी सादर केलेली मिमिक्रीने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. चेहरा है या चांद खिला है हे त्यांनी गायलेले गीतही श्रोत्यांना खूप भावलं.
या कार्यक्रमासाठी खास सोलापूरहुन आलेले प्रसिद्ध प्लस्टिक सर्जन डॉ. चेतन यांच्या बासरी वादनाने तर सर्वांनाच एक वेगळी अनुभुती प्राप्त झाली. रोझा चित्रपटातील रोजा जानेमन हे गीत त्यानी गाऊन आणि सोबत बासरी वादन करून सादर केले तेव्हा टाळ्याच्या कडकडाट झाला. शिटी गायनाचे विविध विक्रम नावावर असलेल्या डॉ. मृणाल यांनी शिटी वाजवत ‘लग जा गले’ आणि ‘ये शाम मस्तानी’ ही गीते सादर केली. डॉ. ऐश्वर्या स्वामीनाथन यांनी ‘बाहो मे चले आ’ आणि ‘चूरा लिया है जो दिल को’ ही गीते सादर केली.
डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस च्या विद्यार्थीनि ऊर्जा शरफ यांनी की बोर्डवर ‘पहला नशा पहला खुमार’ हे गीत सादर केले तेव्हा सभागृहातील अनेकांना आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली! अनिश सेठी यांच्या ‘स्टँड अप कॉमेडी’ ला श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

उपस्थितांचे स्वागत नवी मुंबई रोटरी क्लब हिल साईड चे अध्यक्ष विजयराव शिंदे आणि सचिव हरेश शाह यांनी केले. याप्रसंगी डी वाय पाटील रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल पेद्देवाड , डीन डॉ.सुरेखा पाटील, निवृत्त पोलिस महानिरीक्षक विजय सिंग जाधव यांची विशेष उपस्थिती होती

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!