डोंबिवली :- ( शंकर जाधव ) औद्योगिक क्षेत्रातील नाल्यात प्रचंड प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला आहे आणि तोही फक्त नागरी वस्तीतून गोळा केलेला कचरा कोणीतरी जाणीवपूर्वक या नाल्यात टाकलेला आहे. परिणामी संपूर्ण नाला वाहणे बंद झाला आहे. याचीच दुर्गंधी परिसरात पसरेल आणि केमीकल्स कंपन्यांना जबाबदार धरले जाते. यामुळे खबरदारी म्हणून कामाचे पदाधिकारी स्वतःचे कामगार घेवून स्वतः नाल्यात उतरले आहेत आणि नाला साफ करून घेत आहेत.
औद्योगिक महामंडळ आणि कल्याण महानगरपालिका याबाबत कोणत्याही प्रकारची मदत करत नाही आणि जबाबदारी सुध्दा स्वीकारत नाही. असा आरोप कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला. बरेच वेळा महानगरपालिकेची मलनित्सारण वाहने बिनदिक्कतपणे नाल्यात किंवा मोकळ्या जागेत खाली करत असतात असेही ते म्हणाले ,औद्योगिक विभागात एम. पी. सी बी किंवा एन.जी.टी सारख्या संस्थांचे वरिष्ठ उच्च अधिकारी जेव्हा पाहणी करण्यासाठी येतात त्यावेळी त्यांना फक्त येथील अस्वच्छता नजरेस पडते आणि परिणामी उद्योग,सीईटीपी अथवा डीबेसा यांना जबाबदार धरले जाते. त्यांना ही कामें कल्याण महानगरपालिका आणि औद्योगिक महामंडळाची ही कामें आहेत हे ठाऊक नसते आणि ते ही स्वच्छता उद्योजकांकडून अपेक्षित करतात.अशी खंत त्यांनी व्यक्त केली ते म्हणाले, कामा संघटना ही कामे खाजगी तत्वानुसार उद्योजकांकडून पैसे घेवून करून घेते. उद्योजक सुध्दा केवळ संघटना मागते आणि कामं होतात म्हणून पैसे देतात तरी प्रश्न उभा राहतो की मग महामंडळाला आणि महानगरपालिकांना आपण सर्व्हीस चार्जेस आणि मालमत्ता कर का द्यायचा.असा सवाल त्यांनी विचारला आहे. औद्योगिक क्षेत्र हे प्रदूषणासाठी बदनाम ठरवलेले आहेच त्यात आणखी भर पडत आहे. कामा संघटनेनं याबाबत जो कोणी जबाबदार असेल त्यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली.