भारत

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

आंतरराष्ट्रीय योगदिन जागृतीत उल्लेखनीय कार्य

नवी दिल्ली, 07 : आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्राला आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील नॅशनल मीडिया सेंटर मध्ये आयोजित कार्यक्रमात पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आयुष राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक, प्रेस काँसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया पुरस्कार परिक्षण मंडळाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी.के.प्रसाद आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव रवि मित्तल यावेळी मंचावर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणा-या प्रसार माध्यमांना प्रथमच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून महाराष्ट्रातून या पुरस्कारावर औरंगाबाद आकाशवाणी केंद्राने पहिली मोहर उमटविली आहे. यावेळी नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्र अशा तीन श्रेणीत एकूण 30 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नभोवाणी श्रेणीत औरंगाबाद आकाशवाणी केंद्राचा सन्मान करण्यात आला. आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे (कार्यक्रम) अतिरीक्त महासंचालक निरज अग्रवाल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या योग विषयक कार्यक्रमांची दखल

21 जून रोजी साज-या होणा-या आंतरराष्ट्रीय योगदिना विषयी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी औरंगाबाद आकाशवाणी केंद्राने उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती करून योग विषयक माहिती श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविली. या केंद्राने योग विषयक जनजागृतीसाठी एकूण 20 कार्यक्रमांची निर्मिती केली. यात प्रामुख्याने ‘योग करण्याचा योग आला’ हा फोन इन कार्यक्रम, सकाळच्या सत्रातील ‘अमृतधारा’ सदरात योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, उर्दू सेवेतील ‘योगा रखे आपको फिट’ कार्यक्रम, योगावर आधारीत पोवाडा , महिला विषयक कार्यक्रमांमध्ये आरजें द्वारे देण्यात येणा-या योगविषयक लिंक आदिंचा समावेश आहे.

या केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सर्वश्री उन्मेश वाळींबे, जावेद खान आणि नम्रता फडके यांनी केंद्र प्रमुख जयंत कागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग विषयक कार्यक्रमांची आखणी करून त्यांची निर्मिती व प्रत्यक्ष प्रसारणात मोलाची भूमिका वठविली. औरंगाबाद शहरातील हिमायतबाग मैदानावर जावून तेथे योग करणा-या तरूण ,तरुणींसह ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती घेवून प्रसारीत करण्यात आल्या. ‘योग करण्याचा योग आला’ या 30 मिनीटांच्या फोन इन कार्यक्रमाचे खास कौतुक झाले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रोत्यांना योगासनांची सवीस्तर माहिती व त्याचे उपयोग विषद करण्यात आले.

‘अमृतधारा’ कार्यक्रमात योगतज्ज्ञ डॉ चारुलता रोजेकर यांचे योग विषयावरील मार्गदर्शनाचे एकूण चार कार्यक्रम प्रसारीत करण्यात आले. यावर्षी योगदिनानिमित्त देण्यात आलेल्या ‘योग आणि तापमानवाढ’ या विषयावर अष्टांग योगतज्ज्ञ डॉ. सोनल कुलकर्णी यांनी केलेल्या मार्गदर्शनावर आधारीत कार्यक्रमही श्रोत्यांच्या पसंतीस आला. योग ‍शिक्षीका स्मीता वेद यांच्या मार्गदर्शनावर आधारीत ‘ऑडियो प्रोमो’ ही प्रसारीत करण्यात आले.

दुपारी 12 ते 1 या वेळेत प्रसारीत होणा-या महिला विषयक कार्यक्रमांमध्ये आरजें द्वारे योग विषयक महत्वाच्या टिप्सही देण्यात आल्या यात आरजे ऋतीका आणि शिवाणी यांच्यासह रेडिओसखी सुप्रिया देशपांडे, सरिता देशमुख आणि उद्घोषक नितीन देशपांडे यांनी आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीत श्रोत्यांना योग विषयाची माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय योगदिनी शाहीर अजिंक्य लिंगायत आणि साथीदारांनी सादर केलेला ‘योग विषयक पोवाडा ’ श्रोत्यांच्या खास पसंतीस पडला. या केंद्राच्या उर्दू सेवेद्वारे सबरंग सदरात योगविषयक माहितीचा ‘योगा रखे आपको फिट’ हा कार्यक्रम प्रसारीत झाला. या सर्व कार्यक्रमांची उत्तम निर्मीती व प्रभावी प्रसारणात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी औरंगाबाद केंद्राला या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याच कार्यक्रमात वृत्तपत्रांच्या श्रेणीत गोव्यातून प्रसिध्द होणारे मराठी ‘दैनिक नवप्रभा’ आणि मुंबईतून प्रसिध्द होणा-या ‘मीड डे’ या वृत्तपत्राचांही सन्मान करण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!