राज्यपालांच्या हस्ते 60 व्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई, दि. 7 : कलाविश्वात काम करीत असताना युवक आणि महिला कलाकारांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून कला, संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
कला संचालनालयाच्या वतीने आयोजित 60 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, कलाकार हा ईश्वराची देणगी आहे. कला ही प्रत्येकाला विकसित करीत असते. कलाकारांनी नेहमी व्यापक दृष्टिकोन बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून समाजाला नवी दिशा मिळते. त्यामुळे अशा कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणे गरजेचे असून त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले गेले पाहिजे. कलाक्षेत्रात महिलांचाही सहभाग वाढत आहे. त्यामुळे शासनाने महिलांच्याही कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणावे. व्यक्तीमध्ये दडलेल्या विविध कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रातील नवीन कलाकारांनी पुढे येऊन कला विश्वात अमूल्य योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले पद्मभूषण अकबर पद्मसी यांचे काल निधन झाल्याबद्दल राज्यपाल यांनी दु:ख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच 2019-20 च्या कला प्रदर्शनातील विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करुन कलाकारांच्या कलेचा देशभरात सन्मान व्हावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केली.
फोर्टस्थित जहांगिर आर्ट गॅलरी येथे आयोजित या कला प्रदर्शन कार्यक्रमाप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, कला संचालनालयाचे संचालक (प्र) राजीव मिश्रा यांच्यासह पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे कुटुंबीय आणि अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.