मुंबई, दि. 7 :नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 44 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 63 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, पालघर वगळता अन्य पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा 19 नोव्हेंबर 2019 रोजी करण्यात आली होती. पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा 17 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आली होती. सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा होत्या.
जिल्हा परिषदनिहाय झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार टक्केवारी अशी: नागपूर- 67, अकोला- 63, वाशीम- 57, धुळे- 65, नंदुरबार- 65 आणि पालघर- 63 .