” शेतकरी हवालदिल , अधिकारी संगदिल “
शेतांचे नुकसान
अवास्तव पंचनामे
फसवी आकडेवारी
मोखाडा : (दीपक गायकवाड )मोखाडा तालुक्यात मागील पावसाळी हंगामात पावसाने तुंबळ धुमाकुळ घालीत शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. यात शेतीच्या नुकसानी बरोबरच उपजाऊ भातशेतांचेही अतोनात नुकसान झाले आहे. मात्र 8 हजार 600 रुपये एव्हढ्या तुटपुंज्या शेतीच्या नुकसान भरपाई वरच शेतक-यांची बोळवण करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील हंगामात विस्कटलेल्या शेतांमधून भात पिकवायचे कसे ? ही विवंचना शेतक-यांना भेडसावत आहे.
मोखाडा तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतांच्या बाधांची प्रचंड प्रमाणात तुटफुट झालेली आहे. कृषी विभागाने 47.25 हेक्टर क्षेत्रावरील तुटफुटीचे पंचनामे केलेले आहेत. व प्रतिहेक्टर 37500 रुपये नुकसान भरपाई ची मागणी नोंदवलेली आहे. दरहेक्टरी 400 रनिंग मिटर बांधांची नुकसान ग्राह्य मानण्यात आलेली आहे. मात्र सरकारी कागदोपत्री दाखवलेली ही तुटफुट वस्तुस्थिती निदर्शक नसल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी भरपाई पासून वंचित रहाणार असल्याने तालुक्यातून नाराजीचा सूर निघत आहे.
त्यातच हेक्टरी 400 रनिंग मिटर प्रमाणे मिळणा-या 37500 रुपये नुकसान भरपाई मध्ये फक्त 85 रुपये ईतकी अत्यल्प मजुरी हातात पडणार असल्याने बांधांची दुरुस्ती करतांना शेतक-यांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. शासनाने रोजगार हमीच्या मजुरीच्या तुलनेत दुरुस्तीची भरपाई निर्धारित करण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.
याबाबत मोखाडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रस्तुत माहिती मिळाली आहे. परंतु नुकसान भरपाईची तरतुद अद्याप झालेली नसल्याची माहिती यावेळी संबंधीत अधिका-यांनी दिलेली आहे.
भात आणि नागली ही उपजीविकेचे पिके असून नेमक्या याच शेतांचे नुकसान झाल्याने शेतक-यांची अवस्था अत्यंत दीनवाणी झालेली आहे. त्यातच तालुक्यात कुठेही वस्तुनिष्ठ पहाणी झालेली नसून कार्यालयात बसूनच नुकसानीचा ताळमेळ बसवण्याचा अजब मेळ कर्मचाऱ्यांनी साधला असून कृषी विभागाचा एकही कर्मचारी नुकसानीची पहाणी करण्यासाठी बांधावर आलाच नसल्याची ओरड शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो शेतक-यांना दुरुस्तीपासून वंचित रहावे लागणार आहे. मोखाडा तालुक्यात 13933 हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैकी 1991 हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. त्यापैकी 47.25 हेक्टर क्षेत्र क्षतिग्रस्त दाखविण्यात आले आहे. म्हणजे एकूण क्षेत्राच्या केवळ 5 % क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाकडून दाखविण्यात आले आहे.
दरम्यान तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांनी आपल्या झालेल्या नुकसान भरपाई साठी आपले 7/12 आणि 8 ‘ अ ‘ आपल्या भागातील संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडे देण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. म्हणजे बांधांच्या दुरुस्तीची तरतुद करने सुलभ होईल.