सुप्रसिद्ध कलाकारांचा सहभाग
पनवेल : प्रतिनिधी क्रांतिवीर प्रतिष्ठान, शिरढोण यांच्यावतीने प्रथमच यंदा क्रांतिवीर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुरमाळे बस स्टॉप समोरील मांटाण मैदानामध्ये 15 ते 20 जानेवारी दरम्यान क्रांतिवीर महोत्सव पार पडणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रथमच एवढा भव्य महोत्सव होत असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. बुधवार, दि. 15 जानेवारी रोजी भाजप नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार राजूदादा पाटील, आमदार महेंद्र थोरवे आदींची उपस्थिती असणार आहे. तर सिने अभिनेत्री जुई भेंडखळे हिची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
बुधवार, दि. 15 जानेवारी रोजी जगदीश पाटील प्रस्तुत ठाणा बँड यांचा गाण्यांचा कार्यक्रम, क्रांतिवीर कला मंच विकी जाधव व शालेय नृत्याविष्कार सादर होणार आहे. गुरुवारी 16 जानेवारीला ‘लिंबू कापला’ फेम मयूर नाईक व ‘आगरी झुझू किंग’ रणजीत ठाकूर यांच्या आगरी गाण्यांचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर यावेळी एकेरी खुली नृत्य स्पर्धा देखील पार पडणार आहे. शुक्रवार, दि. 17 जानेवारी रोजी ‘याल तर हसाल’ फेम संजीवन म्हात्रे हे मनोरंजनातून श्रोत्यांचे प्रबोधन करणार आहेत. शनिवार, दि. 18 जानेवारी रोजी ‘एकच वादा राजु दादा’ फेम परमेश माळी आपल्या गाण्यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी मिस रायगड स्पर्धा होणार आहे. रविवार, दि. 19 जानेवारी रोजी स्टेपआर्ट प्रस्तुत जल्लोष सुवर्ण युगाचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. तसेच पापलेट फेम चिंतामणी शिवडीकर, मेल-फिमेल आवाज फेम मोहन फुंडेकर हे आपली कला सादर करणार आहेत. सोमवार, दि. 20 जानेवारी रोजी देविदास पाटील प्रस्तूत रुप कला ऑर्केस्ट्रा, माझ्या देवाच नाव गाजतय फेम रोहित पाटील, द्रवेश पाटील यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, निलेश भोपी, विजय भोपी, सुशांत वेदक यांनी केले आहे.