नाथभक्तांच्या पदस्पर्शाने रस्ते झाले पावन
मोखाड्यातील घाटातुन पायी दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे करताहेत मार्गक्रमण.
मोखाडा (दीपक गायकवाड) : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे 20 जानेवारी ला होणार्या संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी , वेगवेगळ्या भागातून पायी दिंड्या जातात. या दिंड्या आता मोखाड्यातील सुर्यमाळ – आमला आणि तोरंगण घाटातुन मार्गक्रमण करत आहेत. यावेळी घाटातील रस्त्यात, ठिक ठिकाणी रिंगण, आणि माऊली चा गजर करत वारकरी तल्लीन होत आहेत. त्यामुळे माऊली च्या गजराने, मोखाड्यातील डोंगर द-या दुमदुमल्या आहेत.
शेकडो वर्षाची अखंडीत परंपरा असलेल्या, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पायी दिंड्या घेऊन येतात. हीच परंपरा पालघर, ठाणे, जिल्ह्यातील आणि गुजरात हद्दीतील वारक-यांनी जपली आहे. पालघर, वाडा, भिवंडी, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि गुजरात हद्दीतील वारकरी पायी दिंड्या घेऊन त्र्यंबकेश्वर येथे निघाले आहेत. या पायी दिंड्या आता मोखाड्यात दाखल होत आहेत.तर काही दिंड्या खोडाळा आणि मोखाडा येथे मुक्कामी राहून मार्गस्थ झालेल्या आहेत. शेकडोंच्या संख्येने वारक-यांच्या दिंड्या रोजच येत आहेत. दिंडीतील महिला, पुरूष आणि अबालवृद्ध वारकरी घाटातील रस्त्यांमध्ये टाळ, मृदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन माऊलीचा गजर करत आहेत. कुठे रिंगण करून महिला फुगड्या खेळत आहेत. त्यामुळे मोखाड्यातील तोरंगण आणि सुर्यमाळ – आमला घाटात वातावरण भक्तीमय झाले असुन माऊलीच्या गजराने डोंगर द-या दुमदुमल्या आहेत.
वारकरी दिंड्या त्र्यंबकेश्वर कडे जात असताना, खेडोपाडी, आणि रस्त्यालगतच्या गावात मुक्काम करतात. त्यावेळी दमलेल्या वारकर्यांच्या चेह-यांवर थोडाही शीण जाणवत नाही, त्याचे कारणही तसेच आहे,प्रयेक मुक्कामी कीर्तन आणि भारूडाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाने सर्व वारक-यांचा शीण नाहीसा होतो.यावेळी प्रत्येक गांवागांवांतुन दिंडीतील नाथभक्तांसाठी प्रितीभोजनाचे आयोजन केले जाते. सकाळी पुन्हा वारकरी थंडी, ऊन आणि वारा याची परवा न करता त्र्यंबकेश्वर कडे पुढे जात आहेत. एकूणच मोखाडा तालुक्यात यात्रोत्सवाच्या अगोदर पासूनच भक्तिमय वातावरण असते.