डोंबिवली ( प्रतिनिधी ) राजेंद्रनगर-कुर्ला पटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली-डोंबिवली दरम्यान बिघाड झाल्याने रेल्वे प्रशासनाने जलद मार्गावरील वाहतूक धीमी मार्गावर वळवण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती .अखेर बारा वाजण्याच्या सुमारास दुसरे इंजिन जोडून ही गाडी मार्गस्थ करण्यात आली .ऐन सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस ही वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
सकाळी १० वाजून ३५ मिनिटाच्या सुमारास पाटण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या या एक्स्प्रेसच्या इंजिनात ठाकुर्ली आणि डोंबिवली स्टेशनच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामूळे फास्ट ट्रॅकवरून मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेने फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावर वळवण्यात आली .ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस फास्ट ट्रॅकवर लोकलच्या एकामागोमाग एक अशा रांगा लागलेल्या पाहायला मिळाले. तर बराच वेळ उलटूनही लोकल जागेवरून हालत नसल्याने अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरून पायी चालणे पसंत केले. तर मध्य रेल्वे प्रशासनानेही तातडीने नविन इंजिन मागवून बंद पडलेले इंजिन हटवण्याची कार्यवाही सुरू केली. ११ वाजून ५० मिनीटांनी नवीन इंजिन जोडून ही एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यात आली मात्र या सर्वच प्रक्रियेत मध्य रेल्वेच्या लोकल वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडून गेले. या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.