ठाणे :बदलापूर येथील एमआयडीसी परिसरात जे.के.रेमेडीज या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ९ च्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. स्फोटाची तिव्रता भयंकर असल्यानं विष्णु धडाम या ६० वर्षाच्या कामगाराचा जागीच मृत्यु झाला. आगीची माहिती मिळताच कुळगाव-बदलापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि एका तासाच्या अथक परिश्रमा नंतर त्यांनी आगीवर नियत्रंण मिळवलं.दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांत बेकायदेशीररित्या विस्फोटक कारखाने सुरु असूनही त्याकडे प्रशासन हेतुपुरस्सर डोळेझाक करत आहे. त्यामुळे धोकादायक सर्व कारखान्यांचे निरीक्षण करण्याची मागणी केली जात आहे. तारापूर येथील एका कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एका समितीची स्थापना केली आहे.
या स्फोटाच्या घटनेत आणखी तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा हादरा बदलापूर पूर्व परिसरातील आनंदनगर ,शिरगाव, कात्रप मानकीवली, खरवई जुवेली आदी परिसरातील सुमारे तीन किलोमीटर परिसरात जाणवला.