अंबरनाथ दि. २९ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
अंबरनाथ नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वतीने “आंतरशालेय बाल आनंद मेळावा २०१९-२०” आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन शिक्षण मंडळाच्या वतीने अंबरनाथ पश्चिमेकडील न.पा. प्राथमिक शाळा क्रं. ६/१६ मोरिवली येथे करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अब्दुलभाई शेख यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर बाल आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य विक्री, खाद्यपदार्थ विक्री आदी स्टॉल लावण्यात आले होते. तसेच शस्त्र प्रदर्शन, मराठी, उर्दू, कन्नड, तेलगू, तमिळ भाषिक ग्रंथ प्रदर्शन व कला महोत्सवाचे चित्र व हस्तलिखित निबंध प्रदर्शन आणि शालेय विद्यार्थ्यांकरिता शिवकालीन शस्त्रास्त्र, मोडिलिपी कागदपत्र, नाणी संग्रहाची माहिती व्हावी याकरिता आदी प्रदर्शन भरविण्यात आले होते.
याप्रसंगी अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अब्दुलभाई शेख, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका वैशाली थेटे, कमलाकर सूर्यवंशी, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी गजानन मंदाडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.