उद्यापासून कुष्ठरोग निवारण पंधरवडा
मुंबई, दि. 29 : कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त उद्यापासून 13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त उद्या सर्वत्र ग्रामसभांचे आयोजन करुन कुष्ठरोग निवारणाबाबत शपथ घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनामार्फत कुष्ठरोग निर्मूलन मोहीम ऑक्टोबर 2020 पर्यंत राबविण्यात येणार आहे. दरवर्षी 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग निवारण दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त यावर्षी 13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा केला जाणार आहे. जाणीव जागृतीसोबतच कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती समाजातील विविध घटकांना देण्यात येणार आहे.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत यावर्षी ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ हे घोषवाक्य ठेवण्यात आले असून त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलन करण्याकरिता राज्यात प्रयत्न केले जात आहेत.
उद्या सर्वत्र ग्रामसभा घेण्यात येत असून त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाचे वाचन केले जाणार आहे. सरपंच अथवा गावातील मान्यवर यावेळी कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन करतील. गावातील ज्येष्ठ व्यक्ती महात्मा गांधीजींची वेषभूषा करुन त्यामार्फत कुष्ठरोग निर्मूलन विषयक संदेश दिला जाणार आहे. कुष्ठरोगाबाबत शंका निरसन यावेळी केले जाईल. गावात कुष्ठरोगी असल्यास त्यामार्फत ग्रामसभेत आभार प्रदर्शन करण्यात येईल.
जनजागृती कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथनाट्य, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी संदेश दिला जाईल. स्पर्श अभियान राबविण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका समन्वय समिती करण्यात आल्या आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.