डोंबिवली ( शंकर जाधव ) एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्पाच्या कल्याण येथिल इंदिरानगरमध्ये अंगणवाडीत बालविकास प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील व मुख्यसेविका सुषमा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा नुकताच पार पडला. सही पोषण-देश रोशन या पोषक आहार, बेटी पढाओ-बेटी बचाओ, आदी विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. नाटक, नृत्य याद्वारे सही पोषण देश रोशन व बेटी बचाओ-बेटी पाढाओचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला सुषमा खरात, प्रभावती वांद्रे, डॉ.संचिता मोडक, सेलियन, मुख्याधिपिका सोनवणे, विशाल केणे तसेच डॉ. संध्या उपस्थित होत्या. सुषमा खरात यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली व उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कुष्ठ रोग, मातृवंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, यावर मार्गदर्शन केले. प्रोबोधिनी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनवणे यांनी किशोरवयीन मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजावून सांगितले. तर प्रभावती वांद्रे यांनी पोषण अभियान व यांची उद्दिष्ट्ये याबाबत सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे या प्रसंगी बेटी बचाओ बेटी-पढाओची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सुषमा धांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी सेविका धांडे, वैष्णवी कोर, करुणा निकम, सीमा भुणभुणे, प्रतिभा सोनवणे, वैशाली गायकवाड, तसेच मदतनीस शुभांगी भगत, सुनीता परदेशी, संगीता घोक्षे, रोशनी गायकवाड व श्रीदेवी मऊळे यांनी अथक परिश्रम घेतले.