डोंबिवली ( शंकर जाधव ) २६ जुलै आणि ४ ऑगस्ट २०१९ रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे कोपरगाव, कोपररोड या दोन प्रभागातील हजारो कुटुंबीयांच्या घरात पाणी शिरले होते.यात घरातील सामानाचे नुकसान झाले तर अनेक कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पडला होता.येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पूरग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी म्हणून पाठपुरावा केला. अद्याप शासनाच्या दिरंगाईमुळे पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे ७ महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबीयांनी मंगळवारी कल्याण येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पूरपरिस्थितीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबियांना १५ हजार रुपये अशी आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र त्यानंतर फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला.शासनाने गरिबांच्या दुखःची जान ठेऊन याबाबत पूरग्रस्तांना माहिती देणे आवश्यक होते.शासनाची दिरंगाईचा फटका पूरग्रस्तांना बसत असल्याने अखेर पूरग्रस्तांनी शासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.शनिवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी कल्याण येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले,स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते कि सरकार आपले असले तरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरा. त्यामुळे पूरग्रस्तांना शासनाने जाहीर केलेली मदत जोवर मिळत नाही तोवर आंदोलन करणार. तर पूरग्रस्तांनी शासन आमच्यावर मोर्चे आणि आंदोलने करण्याची वेळच का आणते ? आमचे मत हवे असेल तर यावर सरकारने विचार करून आमचे जे हक्काचे आहे ते लवकरात लवकर द्यावे अश्या शब्दात शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.
कल्याण तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी शासनाने १४ कोटी रुपये जाहीर केले आहे. मात्र अद्याप हि रक्कम आली नाही. ही रक्कम आल्यावर प्रत्येक पूरग्रस्तांच्या खात्यात जाहीर केल्याप्रमाणे वळती केली जाईल.
–कल्याण तहसीलदार दीपक आकडे