डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील धोकादायक म्हणून जाहीर केलेला पूर्व पश्चिम जोडणारा कोपर पूल बांधण्यासाठी पालिकेने निविदा काढली पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. हे काम करणारे विशिष्ठ पद्धतीचे लोक असल्याने असे काम करणारे कमी लोक आहेत म्हणून पालिकेने आता रेल्वेला साकडे घालून रेल्वेकडे असे काम करणारे असतील ते पाठवून देण्याची विनंती केली आहे व या कामात सहभागी होण्याची विनंती केली आहे.
कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेने कोपर पूल बांधण्यासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात आली पण त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने दुसरी निविदा काढण्यात आली या संदर्भात पालिका सूत्रांच्या माहितीनुसार कोपर पुलाचे काम हे वेगळ्या पद्धतीचे असून पूल तोडून नवीन पूल बांधायचा आहे यासाठी रेल्वेचे ब्लॉक मिळणे अवघड असते शिवाय असं काम करणारे कमी लोक आहेत यामुळे ठेकेदार पुढे येण्यास तयार नाहीत असे सांगण्यात आले. धोकादायक झालेल्या कोपर रेल्वे उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे सेफ्टी कमिशनची परवानगी वगळता रेल्वेच्या सर्व मंजुऱ्या मिळाल्या आहेत. केडीएमसीने डिसेंबरमध्ये या पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदा देखील मागविल्या होत्या. त्यामुळे कोपर पुलाच्या दुरुस्तीचे काम जून अखेर पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. हा पूल वाहतुकीला बंद करून आठ महिने उलटले आहेत. त्यातच अजून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे कोपर पुलाच्या दुरुस्तीचे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. पाडकाम करण्यासाठी रेल्वेचे तब्बल २८ तर, नवीन बांधकाम करण्यासाठी किमान ४ असे एकूण ३२ ब्लॉक घ्यावे लागणार आहेत. याच दुरुस्तीच्या कामांतर्गत राजाजी पथवरील पुलाची नव्याने उभारणी, माहावितरणच्या केबल शिफ्टिंग व पुलावरील इलेक्ट्रिकल कामे करण्यात येणार आहे. मात्र पुलाच्या दुरुस्तीच्या काम करण्यासाठी मागविलेल्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा निविदा मागवाव्या लागल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांचेशी संपर्क केला असता त्यांनी रेल्वेला या कामासाठी सहभागी करून घेण्यासाठी पत्र पाठवले असल्याचे सांगितले. शिवाय हे काम विशिष्ठ पद्धतीचे असल्याने कमी लोक आहेत म्हणून विलंब होत असल्याचे त्या म्हणाल्या .पुलाचे काम लवकर व्हावे म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.