ठाणे दि. 3 जिमाका:- आधुनिकीकरण आणि संगणकामुळे ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कामाचे स्वरुप बदलले असून ते अधिक गतीमान झाले आहे याचा अभिमान वाटतो असे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोषागार दिनाच्या शुभेच्छा देतांना काढले.
संचालनालय ,लेखा व कोषागारे महाराष्ट्र शासन मार्फत दरवर्षी दि. 1 फेब्रुवारी हा दिवस कोषागार दिन पाळण्यात येतो. त्यानिमीत्ताने जिल्हा कोषागार कार्यालयास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी देयकांचे प्रदान, कोषागार व विविध कार्यालयांमधील समन्वय या विषयावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक श्रेणी) श्री राजेश भोईर उपस्थित होते.
या दिनाचे औचित्य साधून दुपारच्या सत्रात ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या मार्च महिन्यातील देयकांचे वित्त विभागाच्या निर्देशानुसार सुयोग्य नियोजन करण्याकरिता परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादास सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभाग श्री सिताराम काळे यांनी मार्गदर्शन केले.
शासकीय अनुदानाचा योग्य रित्या विनियोग करून देयके वेळेवर पारित करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती बाबत मार्गर्दर्शन करण्यात आले. विविध विभांगांच्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन श्री काळे यांनी केले.
जिल्हा कोषागार अधिकारी श्री राजेश भोईर यांनी आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावयाची दक्षता, नियम आणि देयके विहित मुदतीत सादर करताना आवश्यक बाबी तसेच बदलत गेलेले कामाचे स्वरुप याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी अप्पर कोषागार अधिकारी श्रीमती कल्पना थोरात यांनी मार्गर्दर्शन केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे वित्त अधिकारी, लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, कोषागार कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मध्ये सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी १५० अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.