मुंबई

पोलीस दल देणार तंदुरूस्तीचा संदेश; रविवारी ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय दौड’

मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मुंबईमध्ये रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या मॅरेथॉनमागे असून समाजातील सर्व घटकांनी या दौडमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

ही मॅरेथॉन दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते 9 या वेळेत होणार आहे. ‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया’ या चळवळीद्वारे पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अखिल भारतीय पोलीस महासंचालकांच्या परिषदेमध्ये ठराव करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश करीत आहेत.

42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन, 21 कि.मी.ची हाफ मॅरेथॉन, 10 मैल किंवा 16 कि.मी. दौड आणि 5 किलोमीटरची टाईम रन अशा चार प्रकारांमध्ये या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. फुल मॅरेथॉन ही गेट वे ऑफ इंडिया ते राजीव गांधी सागरी सेतू आणि परत अशी असणार आहे. हाफ मॅरेथॉन ही राजीव गांधी सोगरी सेतू येथून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडिया येथे समाप्त होईल. 10 मैलांची दौड राजीव गांधी सागरी सेतू ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत तर टाईम रन गेट वे ऑफ इंडिया ते एनसीपीए पर्यंत असणार आहे.

या दौडच्या मार्गावर महाराष्ट्र पोलिसांद्वारे ‘सजग आणि समर्थ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य दौडचा भाग म्हणून 31 जानेवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौडचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या नेतृत्वाखाली 31 जानेवारी रोजी मिडनाईट इव्हेथॉनचेही आयोजन केले होते. यामध्ये महिला पोलीस अंमलदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीसह 1 हजार 200 पेक्षा अधिक टायग्रेस मॉम्सनी सहभाग घेतला होता. पोलीस महासंचालक यांच्या पत्नी श्रीमती नॅन्सी सुबोध जयस्वाल यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

दि. 2 फेब्रुवारी रोजी ‘राईड टु राईझ’ या सायकलिंगचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 500 सायकलपटुंनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यातील 10 जण अंध होते. प्रदूषणमुक्त समाज, युवकांशी संवाद तसेच स्वस्थ भारत अभियानाला चालना देणे हा त्याचा उद्देश होता.

रविवारी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना 2 हजार फिजिओथेरेपिस्ट, 300 होमिओपॅथी व आहारतज्‍ज्ञ मोफत सल्ला व उपचारासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत, अशीही माहिती पत्रकात देण्यात आली आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!