ठाणे

नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ‘कायाकल्प’ पुरस्काराने सन्मान

ठाणे दि १८ फेब्रुवारी २०२० : ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत केंद्र शासनाच्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा अंतर्गत नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सोमवारी नियोजन भवन येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अनगावला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर उर्वरित आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशंसात्मक पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, आरोग्य व बांधकाम सभापती वैशाली चंदे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर, समाजकल्याण समिती सभापती संगीता गांगड, कृषि-पशू-दुग्धशाळा समिती सभापती किशीर जाधव, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) डी. वाय. जाधव, मुख्यलेखा व वित्त अधिकारी गीता नागर, आरोग्य अधिकारी मनिष रेंगे व्यासपीठावर उपस्थित होते.

हे पुरस्कार रुग्णालयाची देखभाल, स्वच्छता, जैविक व्यवस्थापन, जंतूसंसर्ग व्यवस्थापन, सपोर्ट सर्विसेस, स्वच्छता प्रसार, रुग्णालय बाहेरील स्वच्छता आदि सात निकष पूर्ण करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले. यामध्ये भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दाभाड, दिवाअंजूर, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धसई,शिरोशी, शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा, वाशिद, अंबरनाथ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर, कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली आदि प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशंसात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, खातेप्रमुख, आरोग्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!