महाराष्ट्र

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये अपार सृजनशील क्षमता – सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे

पुणे, दिनांक १८ : शासनाची प्रतिमा उंचावण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मोलाचे योगदान असून महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये अपार सृजनशील क्षमता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केले.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा येथील कौन्सिल हॉलमध्ये झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाचे संचालक(माहिती) (प्रशासन) अजय अंबेकर, माहिती, वृत्त व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती) (वृत्त) सुरेश वांदिले, माहिती संचालक हेमराज बागूल, माहिती संचालक गणेश रामदासी, संचालक (विशेष कार्य) शिवाजी मानकर तसेच राज्यातील सर्व उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद (मराठवाडा) संचालक कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘प्रशिक्षणाची किमया’ या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. दिलीप पांढरपट्टे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे म्हणाले, बदलत्या काळानुसार अधिकाऱ्यांनी नवनवीन गोष्टी शिकायला हव्यात. कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ज्ञान ग्रहण करुन त्याचा दैनंदिन कामकाजात वापर करा, असे सांगून डॉ. पांढरपट्टे म्हणाले, लोकराज्य मासिक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मला लोकराज्य मासिकातील माहितीचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामाची व्याप्ती पाहता विविध प्रशासकीय निर्णय गतीने घेण्यात येतील, असे सांगून विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांचे नूतनीकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून यासाठी आवश्यक ते प्रशासकीय पातळीवरील निर्णय गतीने घेण्यात येतील. मराठी भाषा दिन कार्यक्रम यशस्वीपणे राज्यभरात राबविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत विभागनिहाय मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेऊन आगामी वर्षातील कामाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याला यंदा 60 वर्ष पूर्ण होणार असून यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्यासाठीच्या उपाययोजना, रिक्त पदभरती, वेगवान इंटरनेट सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा झाली. फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे संचालक भुपेंद्र कँथोला, समन्वयक रितेश ताकसांडे यांनी मोबाईल जर्नालिझम बाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

संचालक अजय अंबेकर यांनी प्रास्ताविकात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मागील वर्षात घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी वर्षातील नियोजनाबाबत सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला निवृत्त उपसंचालक जगदीशकुमार निर्मल, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सतिश जाधव आणि परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी विकास माळी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पुणे विभागाच्या वतीने उपसंचालक मोहन राठोड यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. यावेळी संवादवारी, माळीण पुनर्वसन हे माहितीपट दाखविले. मोहन राठोड यांनी आभार मानले. यावेळी संचालक व उपसंचालक यांनी नियोजन आराखड्याबाबत सादरीकरण केले. कार्यशाळेला राज्यातील सर्व उपसंचालक व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.

विभागीय माहिती कार्यालयाच्या नूतनीकरण कामाचे
सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते उद्घाटन

नूतनीकरण करण्यात आलेल्या विभागीय माहिती कार्यालयाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक तसेच प्रसिद्ध कवी व गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. नूतनीकरण करण्यात आलेल्या विभागीय माहिती कार्यालयाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. राज्यातील सर्व माहिती कार्यालये या पध्दतीने सुशोभित होण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रशासकीय पातळीवर निश्चितच मदत करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालयाचे संचालक अजय अंबेकर, संचालक सुरेश वांदिले, संचालक शिवाजी मानकर, उपसंचालक मोहन राठोड, पुणे, सोलापूर व सातारा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, रवींद्र राऊत, युवराज पाटील, वृषाली पाटील, गणेश फुंदे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!