अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी
प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात यंदाही प्रवेश नाहीच, टवाळखोरांवर ठेवण्यात आली करडी नजर
अंबरनाथ दि. २१ (नवाज अब्दुलसत्तार वणू) अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून १ किलोमीटर अंतरावर प्राचीन शिवमंदिर असून हे मंदिर तब्बल ९६० वर्षापूर्वीचे आहे. या शिवमंदिरातील गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. या गाभाऱ्यात जाण्यासाठी २० पायऱ्या खाली उतरावे लागते. मात्र, गेल्या काही वर्षापासून हे प्राचीन शिवमंदिर हे दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बंदी घालण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यातील शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने उत्सवांची जोरदार तयार सुरू असतानाच जिल्ह्यातील सर्वात प्राचीन असलेल्या अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने मोठी जत्रा भरत असते, ही जत्रा दोन ते तीन दिवस चालत असून या जत्रेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत आहे. प्लास्टिकच्या खेळण्यासह भोंगा किंवा पिपाणीची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामुळे जत्रेत येणाऱ्या टवाळखोर मुलांकडून कर्कश आवाजात पिपाण्या वाजवत असल्याने त्याचा नाहक त्रास महिला भाविकांना होतो. यासाठी उपाय म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या पथकाने यावर लक्ष ठेवले होते. जर कोणी कर्कश आवाजात पिपाण्या वाजवत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर तत्काळ कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. महाशिवरात्रीसाठी या मंदिरात पहाटेपासून शंकराच्या दर्शनासाठी हजारो भाविक मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक भागातून येतात. प्रथेप्रमाणे मंदिर विश्वस्त व ग्रामस्थांनी पहाटेच्या सुमारस आरती करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते.
प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अंबरनाथ नगरपरिषदेकडून नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, भाजपाकडून अभिजित करंजुळे-पाटील, मनसेचे कुणाल भोईर, यांच्यासह विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटनांकडून प्रसाद वाटपाचे स्टॉल्स लावून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच अंबरनाथ पश्चिमेला स्टेशन परिसरात अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी (अल्पसंख्याक विभाग) शास्त्रीनगर स्वामीनगर वार्डच्या वार्डअध्यक्ष फिरोज अजमेर खान यांच्याकडून ही प्रसाद वाटपाचा स्टॉल्स लावण्यात आला होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, नगरसेवक उमेश पाटील, पंकज पाटील आदींच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले