अंबरनाथ नगरपरिषदेत आढावा बैठक संपन्न
अंबरनाथ दि. २८ (नवाज अब्दुलसत्तार वणू) अंबरनाथ नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रमुख मांगण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाकडून पालिकेच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्रभारी आयोग मुकेश सारवान उपस्थित होते. या बैठकीत अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार, आरोग्य सभापती उत्तम आयवळे, नगरसेवक आनंद कन्नन, आरोग्य विभागाचे खातेप्रमुख सुरेश पाटील, फकीरचंद्र बाल्मिकी, प्रभाकर घेंगट, विनोद चव्हाण, जवाहर चंडाळे, प्रदीप तांबोळी यांच्यासह अनेक पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लाड पागे समिती अंमलबजावणी व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी, राहत असणारी घरे त्यांच्या नावावर करण्यात यावी यासंदर्भात अंबरनाथ नगरपालिका प्रशासनास सूचना देण्यात आलेल्या असून सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, त्यांना न्याय मिळावा याकरिता शासन हे त्यांच्या हितासाठी सकारात्मक असल्याचे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्रभारी आयोग मुकेश सारवान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले कि, सफाई कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, त्यांच्यावर कोणी अन्याय करत असेल, त्यांच्या विकसित योजनांकडे कोणी दिरंगाई करत असेल तर त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग गंभीर स्वरूपाची कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील समस्त सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणारच. असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे प्रभारी आयोग मुकेश सारवान यांनी दिले.
तसेच सफाई कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे गणवेश, धुलाई भत्ता व घाण भत्ता रु. ५०/- देण्यात येतो. परंतु, राज्य सफाई कर्मचारी आयोगाने या भत्त्यात वाढ करत हा भत्ता रु. ३००/- करण्यात आलेला आहे. असे निर्देश हि मुकेश सारवान यांनी प्रशासनास दिले आहे. तसेच वारस हक्कातील फक्त ३ जणांना आजपासून कामावर घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे व उर्वरित जणांना हि लवकरात लवकर घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर अंबरनाथ नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला असता, नगरपालिकेच्या बहुतांश सर्व समस्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी चांगल्या पद्धतीने सोडविलेल्या आहेत, प्रशासन सकारात्मक असून छोटे-मोठे असणारे प्रश्न नक्कीच सोडविले जातील. असेही सफाई कर्मचारी आयोगाचे प्रभारी आयोग मुकेश सारवान यांनी सांगितले.