डोंबिवली ( शंकर जाधव ) : डॉक्टरांची कमतरता, वेळेवर उपचार न मिळणे, औषध्ये उपलब्ध न होणे या अश्या अनेक समस्येमुळे गरीब रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात उपचार मिळत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.यावेळी पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवंगरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
वंचित बहुजन आघाडीने जवळपास तासभर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.यावेळी महापौर आणि पालिका आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.शिवसेना-भाजप सत्ता असूनही गरीब रुग्णांना वेळेवर उपचार आणि औषधे मिळत नसल्याने संताप व्यक्त केला. शास्त्रीनगर रूग्णालयात एक्स रे मशीन चालवणारे टेक्नीशिअन वाढवा, सोनोग्राफी मशीन चालवणारे रेडीओलोजिस्ट व टेक्नीशियन उपलब्ध करा, रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवा आणि तीनही शिफ्टमध्ये काम करणारे डॉक्टरांची नेमणुक करा अशा विविध मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. शास्त्रीनगर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी चंद्रशेखर सावकारे यांच्या कामाबद्दल वंचित समाजाच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली.तर शास्त्रीनगर रुग्णालयात १४५ पदे मंजूर असून यातील ४७ पदे कार्यरत आहेत. यातील ६९ पदे रिक्त आहेत.पालिकेने शास्त्रीनगर रुग्णालयात नव्याने कंत्राटदार पद्धतीने भरती होणाऱ्या डॉक्टर्सना शासनाच्या नियमानुसार चांगला पगार दिला जाणार आहे.त्यामुळे लवकरच रुग्णालयात जास्तीत जास्त डॉक्टर्स उपलब्ध होईल असे आश्वासन डॉ. लवंगारे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी वंचित बहुजन समाजातर्फे शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके, कल्याण – डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे, महासचिव बाजीराव माने, उपाध्यक्ष राजु काकडे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष माया कांबळे , जिल्हा महासचिव अॅड. रजनी आगळे, मीरा प्रधान आदि मान्यवर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.