नवी मुंबई

‘नैना’ची भूमीपुत्रांवर दडपशाही; स्थानिकांना हॉटेल व्यवसायापासून दूर करण्याचे नियोजन?

शिरढोण परिसरातील उर्वरित हॉटेलांवर लवकरच हातोडा
 राजकीय पाठींबा कमी पडत असल्याची स्थानकांत खंत

शिरढोण ( योगेश मुकादम )  : अन्याय सहन केल्याने .  करणारे बलवान होतात. ते अधिकाधिक अन्याय करत राहतात. ‘नैना’ च्या बाबतीत हेच घडत आहे. महिनाभरापूर्वी एक हॉटेल जमीनदोस्त करुन अधिकाऱ्‍यांनी ट्रेलर दाखवून दिलाय. पनवेल तालुक्यातील शिरढोण परिसरामधील उर्वरित हॉटेलांवर हातोडा फिरवण्याची तयारी सुरू आहे. पूर्ण पिक्चर दाखवण्यासाठी अधिकारी-पोलीस कधीही झडप घालू शकतात. कायद्याचा धाक दाखवून दिवसाढवळ्या कायद्यावरच हातोडा फिरवण्याचा असंवैधानिक प्रकार सुरू असतानाही स्थानिकांच्या, लोकप्रतिनिधींच्या मुठी आवळत नाहीत, चिड येत नाही, हे दुर्दैवाचे लक्षण आहे.

मुंबईचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई उभी राहिली. तेव्हा स्थानिक आगरी – कोळी भूमीपुत्रांच्या जमिनी सिडकोने कवडीमोल भावाने खरेदी केल्या. त्याबदल्यात आपल्याला काय मिळाले? हे जरा मागे डोकावून पाहिल्यास समजेल. आता नवी मुंबई देखील कमी पडू लागल्याने तिचा भार कमी करण्यासाठी ‘नैना’चा जन्म झाला. सिडको हे नाव जनमानसात प्रचंड बदनाम झाल्याने ‘नैना’ हे गोंडस नाव देण्यात आले.

नवी मुंबईच्या निर्मितीमध्ये भूमीपुत्रांचा त्याग मोठा आहे. तिसऱ्‍या मुंबईच्या उभारणीमध्ये तर स्थानिकांवर अक्षरशः दडपशाही सुरू आहे. ‘नैना’ आली तेव्हा सक्तीचे कमीत कमी भूसंपादन असे धोरण ठरले होते. आता स्थानिकांचे व्यवसाय मोडीत काढून, लाखो रुपये भरण्यास सांगून त्यांच्या जमिनी सक्तीने विकत घेण्याचा डाव रचला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत, पोलीस बळाचा वापर केला जात आहे. जेणेकरुन स्थानिक हतबल होऊन गुडघे टेकतील.

‘नैना’ला विरोध करण्यासाठी सुरूवातीलाच सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती. अंजनी दमानियांसारख्या ‘प्रसिद्धीलोलूप’ लोकांना बोलवण्यापलिकडे त्यांच्याकडून काहीच झालेले नाही. या समितीकडून ‘नैना’ क्षेत्रामधील नागरिकांमध्ये जनजागृती होणे अपेक्षित होते. मात्र, अजून अनेकांना ‘नैना’ म्हणजे काय? हे सुद्धा माहित नाही. तेव्हा कडाडून विरोध झाला असला तर आज स्थानिकांवर ही वेळ आली नसती. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार, खासदार हे अशा परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी अपेक्षा असते. मात्र, आमचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्‍या काही लोकप्रतिनिधींना फोन देखील उचलण्यास वेळ मिळत नसेल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? अशी खंत स्थानिक व्यक्त करत आहेत़

अन्याय करणाऱ्‍यांविरुद्ध बंड केले पाहिजे. आवाज उठवला पाहिजे. तरच अन्याय करणारे संपुष्टात येतील. अशी शिकवण देशाचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी दिली. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही, ते वाया जाऊही द्यायचे नसते अशा शब्दांत एकीचे बळ दाखवण्याचे आवाहन भूमीपुत्रांना प्रकल्पग्रस्तांचे नेते, आगरी समाजाचा वाघ दि. बा. पाटील यांनी केले. या शिकवणीची प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आज आली आहे.

उद्या हे घरापर्यंत पोहोचतील…
जनमतापेक्षा कोणीही मोठा नाही, हे आपली लोकशाही सांगते. कारण हे लोकांचे राज्य आहे. वडिलोपार्जित जमिनींवर येथील भूमीपुत्रांनी पोटापाण्यासाठी बांधलेल्या हॉटेलवर आज कारवाई सुरू आहे. उद्या हे आमच्या घरापर्यंत पोहोचतील. या हुकुमशाहीला थोपवून लावण्यासाठी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. ‘नैना’ ला थोपवून लावण्यासाठी भूमिपुत्रांनी एकजुटीची भींत बांधण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिकांना सर्वपक्षीय पाठींबा मिळाल्यास त्यांचे व्यवसाय, अस्तित्त्व अबाधित राहणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!