अंबरनाथ दि. १६ (नवाज अब्दुलसत्तार वणू) शहर विकास प्रतिष्ठान (पब्लिक ट्रस्ट अंबरनाथ), डॉ. भाटिया हॉस्पिटल, श्री सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिस्ट कल्याण व इशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत “मोफत भव्य आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे” आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील श्री गुरुविरुपाक्षेश्वर मठ, कामगार पुतळा, मोरीवली नाका, बुवापाडा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, समाजसेविका सौ. पौर्णिमा विलास जोशी आणि अंबरनाथ तेलंगणा सेवा संघमचे अध्यक्ष बुदेश बोलबंडा हे उपस्थित होते. तसेच नगरसेवक उमेश गुंजाळ, श्रीनिवास वाल्मिकी यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. आलेल्या मान्यवरांचे शहर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद चलवादी व सचिव महादेव लोटे आदींनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह तपासणी, ईसीजी तपासणी, नेत्र तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ऑजिओप्लास्टी, बायपास, हृदयाला असलेले चिंद्र, कॅन्सर, गर्भ पिशवी दुरुस्ती, रेटिना ऑपरेशन, मुतखडा, मणक्याची, अन्न नलिका, थायरॉईड कॅन्सर, किडनीचे आजार, हाडांचा ठराविक शस्त्रक्रिया, अस्थमा, लहान मुलांचे तिरकस डोळ्यांचे शस्त्रक्रिया आदी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे शहर विकास प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले. या शिबिरात तपासणी करून मोफत औषधे देखील देण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
हा शिबीर यशस्वी करण्यासाठी शहर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद चलवादी, सचिव महादेव लोटे, खजिनदार सुरेश लोहकरे, सहसचिव प्रमोद सिंगनूरकर, संदीप तेलंगे, गणेश अल्हाट, नवीन चलवादी, राहुल नागदा, अनोक कोत्तामेटी, गोपाळ मेकल, शिवराय नायक, चिदानंद भूपलकर, तिमप्पा चलवादी, रवी वाल्मिकी आदी अथक परिश्रम घेतले.