ठाणे

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ठाणे महानगरपालिकेच्या विविध सुविधा ; 40 खाटांची अलगीकरण सुविधा उपलब्ध: महापालिकेच्यावतीने व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती.

ठाणे(19): कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने कासारवडवली येथे 40 खाटांची अलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी दाखल होणाऱ्या व्यक्तींना 14 दिवस ठेवण्यात येणार असून त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कासारवडवली येथील अलगीकरण कक्षाची सर्व आवश्यक ती देखभाल पाहणे व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून आवश्यक कार्यवाही व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अलगीकरण कक्षात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी डॉ. दिनेश समेळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. अलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी पिण्याचे पाणी, चहा नाश्ता व भोजन यासुविधा पुरवण्यासोबतच सहाय्यक जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रभाग अधिकारी राजेंद्रकुमार माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अलगीकरण कक्षामधील खोल्यांची स्वच्छता व टचपॉंईंट यांची नियमित साफसफाई करण्याची जबाबदारी वैदयकिय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर व मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेंद्र बनसोड यांच्याकडे देण्यात आली आहे. या परिसरातील साफसफाई, धुरवळी, औषध फवारणीची जबाबदारी सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना साबण, हॅण्डवॉश, टॉवेल यासह आवश्यक ते साहित्य पुरवण्यासाठी उप अभियंता संजय कदम यांची तर पिण्याचे व वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी उप अभियंता अतुल कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अलगीकरण कक्षात बायो वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, इमारत व परिसरातील विद्युत दिवे, पथदिवे, वायफाय सुविधा व सीसीटीव्ही आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी उप अभियंता आशिष गुप्ते यांची नेमणूक करण्यात आली आहे. या परिसरात सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उप सुरक्षा अधिकरी भीमराव आगवणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या नियंत्रणाखाली अलगीकरण कक्षात व्यवस्थापक म्हणून तीन पाळ्यांमध्ये प्रफुल्ल कोचरेकर, सुधीर नातू, विवेक म्हात्रे व सुहास रोकडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात येत असून त्यामध्ये शहरातील महत्वाच्या नितीन कंपनी, कॅडबरी, तीन हात नाका, पोखरण रोड २, खोपट, वंदना डेपो, कळवा ब्रिज, माजिवडा, वृंदावन सोसायटी, तलावपाळी, ठाणे सेंटर जेल, शिवाईनगर, मल्हार सिनेमा, कोपरी ब्रिज,प्रभाग समिती कार्यालय यांच्यासह महापालिका मुख्यालय आदी जवळपास ३० पेक्षा अधिक महत्वाच्या ठिकाणी होर्डिंग, बॅनर्स लावण्यात आले आहेत.

शहरातील प्रत्येक सोसायटीमध्ये जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्व स्थानिक वृत्तपत्रात जनजागृतीपर जाहिराती देण्यात आल्या आहेत. दररोज वितरीत होणाऱ्या वृत्तपत्रातून जनजागृतीपर लिफ्लेटचे वाटप करण्यात आले आहे. महापालिकेच्यावतीने जनजागृतीपर व्हिडीओ बनवण्यात आला असून त्याचा विविध माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. महापालिकेतील सर्व वाहनांवर तसेच परिवहन सेवेच्या सर्व बसेसवर जनजागृतीपर स्टिकर्स लावण्यात आली आहेत.

यासोबतच ठाणे भारत सहकारी बँकेच्या सर्व शाखेत जनजगृतीपर स्टँडी लावण्यात आली आहेत. तसेच शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना जनजागृतीपर स्टँडी, पोस्टर्स लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी जागरुक राहून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी काळजी घ्यावी तसेच आवश्यकता नसल्यास घरच्या बाहेर पडू नये व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व प्रभारी महापालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!