मुंबई : करोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून राज्यातील नागरी भागात कलम १४४ लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणाच त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, नाईलाजाने आज मध्यरात्रीपासून आम्ही राज्यात कलम १४४ लागू लागू करीत आहोत. आज मध्यरात्रीपासून परदेशातून देशात कोणीही येणार नाहीत. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांना समाजात फिरू नका, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही समाजात फिरू नका असे आवाहन त्यांनी केले.
मंदिर, मशिदी आदी सगळी धार्मिक स्थळं बंद ठेवावीत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. उगाचच अन्न धान्यांचा साठा करू नका. शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी आहे. करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढतो त्यामुळे अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगताना गरज पडली तर लॉकडाऊन ३१ मार्चनंतर वाढवण्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. जीव वाचवणं आत्ता महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.