महाराष्ट्र

आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा – मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद

मुंबई दि. २३: पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा. व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवताना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यांसारख्या शहरात ताकदीने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी, यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किट्स, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता याकडे लक्ष द्यावे, मोठ्या प्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्या प्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घेण्यात यावे.

गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणाही सज्ज ठेवली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका

मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये, आपण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे, त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे आणि आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

कामाची विभागणी करा
मंत्रालय, मुख्यालय स्तरावर प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावरही कामाची विभागणी केली जावी, यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्यात
औषधे तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणांचे काम सुरु राहील याची काळजी घेतली जावी. जीवनावश्यक वस्तूंची व्याख्या लोकांसाठी आणि यंत्रणेसाठी स्पष्ट करून दिली जावी.

राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. तो पोहोचविण्याची व्यवस्था उभी करावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असताना आणि १४४ कलम लागू झालेले असताना काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत अशांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस, अन्न व औषध प्रशासन , नगरविकास आदी विभागांकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहनही त्यांनी केले.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा- सुभाष देसाई

सगळ्या प्रकारचे इंधन, कच्चामाल, बेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहाव्यात. ई-कॉमर्सला प्रोत्साहन देण्यात यावे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी शासनास सीएसआर अंतर्गत मिळत असलेल्या सहकार्याची माहिती दिली.

जनजागृती वाढावी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
जनजागृती वाढल्यास या विषाणूविरुद्धचा लढा आपण यशस्वीपणे जिंकू शकू. त्यावर लक्ष देण्याची गरज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, या विषाणुचा प्रसार झोपडपट्टयांमध्ये होणार नाही याची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.

रक्तदान शिबीरे आयोजित करण्याची गरज – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील रुग्णालयात रक्तसाठा पुरेसा राहावा यासाठी मर्यादित स्वरूपात लोक एकत्र येतील अशा पद्धतीने आणि आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ब्लड कॅम्पचे आयोजन करण्याची गरज असल्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष वेधले.

प्रभावी प्रशासनाची गरज- मुख्य सचिव

इफेक्टिव्ह पोलिसिंग आणि इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशनची गरज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मंत्रालयात पॉलिसी कंट्रोल रुमची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे विभाग आणि जिल्हास्तरावरही कामाचे आणि जबाबदारीचे वाटप व्हावे. राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. लॉकडाऊन आहे तरी लोक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी असेही ते म्हणाले.

कुठल्याही जाती-धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्ह्याने ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार केला पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी-अधिकारी यांना कामावर कसे येता येईल याची माहिती त्यांना दिली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या खाजगी रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करता येऊ शकतील, त्यांना असे कक्ष तयार करण्याच्या सूचना देऊन त्यांची यादी मंत्रालयात पाठवली जावी असेही ते म्हणाले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!