– ५ माणसांमध्ये साखरपुडा, विवाह करायचा कसा?_
_शुभमंगल करताय…? व्हा सावधान!_
नवी मुंबई (योगेश मुकादम ) : _विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन. सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची घटना असते. त्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय करण्याचा सार्यांचाच प्रयत्न असतो. सध्या वाढतच चाललेल्या ‘कोरोना’ संकटाचा सामना करताना अनेक नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. अनेकांनी आपले विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत. गर्दी जमवून विवाह करताना कुणी आढळल्यास संबंधितांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे शुभमंगल करताना आधी जरा सावधान होणेचे सार्यांच्या हिताचे ठरणार आहे._
‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये कलम 144 लागू केला आहे. त्यानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. शासनाचे आदेश असूनही धुमधडाक्यात लोकं जमवून लग्न केल्याप्रकरणी उरणमधील एका व्यावसायिक वधूपित्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे लग्नसमारंभ साजरे करताना मोजक्याच लोकांना बोलवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नवी मुंबई, पनवेल, ठाणे, रायगड या पट्यामध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. पैशांनी समृद्ध असलेल्या या समाजामध्ये साखरपुड, हळद, लग्न सोहळे अतिशय थाटात साजरे केले जातात.
भव्य स्टेज, विविध प्रकारचे जेवण, बँड, ऑर्केस्ट्रा, डिजेच्या तालावर दणक्यात विवाह सोहळे साजरे होतात. मात्र, यंदा कोरोना विषाणूने थैमान घातल्याने पहिल्यांदाच नियोजित लग्न सोहळे रद्द करण्याची वेळ अनेकांवर आली. तर काहींनी गावामध्ये दोन्ही कुटुंबाकडील मंडळींना बोलावून गुपचूप लग्न सोहळे उरकण्याचा देखील बेत आखला आहे. परंतु अशांवर पोलीस, शासकीय यंत्रणेची करडी नजर असणार आहे. २६ मार्च, २७ मार्च, ३० मार्च, २ एप्रिल, ५ एप्रिल, ६ एप्रिल, ८ एप्रिल या दिवशी विवाह मुहूर्त आहेत. वधू – वर दोन्हीकडील मंडळींनी लग्नाची जोरदार तयारी केली आहे. मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर, डिजे, कॅटरर्स सार्यांना पैसे देऊन बुकिंग केले आहे. पत्रिका देखील छापून वाटून झाल्या. आता ५ लोकांमध्ये लग्नसोहळा पार पाडायचा तरी कसा? असा प्रश्न यजमानांना सतावत आहे.
माझ्या बहिणीचा साखरपुडा ५ एप्रिल रोजी करण्याचे ठरवले होते. नातेवाईकांना आमंत्रण देखील दिले. ‘कोरोना’मुळे अनेक निर्बंध असल्याने आम्ही साखरपुडा पुढे ढकलला असल्याची माहिती नवीन पनवेल येथील निखिल पाटील यांनी दिली. लग्नामध्ये नवरीमुलीचा मेकअप हा वर्हाडी लोकांचे लक्ष वेधून घेणारा असतो. ‘कोरोना’मुळे अनेक लग्न सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. अनेक ऑर्डर रद्द झाल्याने याच मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे मोहोपाडा येथील मेक अप आर्टिस्ट प्रगती ठाकूर यांनी सांगितले. श्री कृपा मंडप डेकोरेटर्सचे संतोष दळवी म्हणाले, मार्च ते मे महिन्यामध्ये दरवर्षी लग्नाच्या खूप ऑर्डर असतात. वर्षातून तीन महिनेच कमावण्याची संधी असते. आताची परिस्थिती पाहता लग्न सोहळे अतिशय साध्या पद्धतीने होतील, असे दिसत आहे. यामध्ये सर्वच मंडप डेकोरेटर्स वाल्यांचे नुकसान होणार आहे. मिळालेल्या सर्व ऑर्डर रद्द झाल्याची माहिती श्री समर्थ कॅटरर्सकडून देण्यात आली.