ठाणे ( ता 9, संतोष पडवळ ) : कोरोना कोव्हीड 19 या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत असून कोवीड बाधीत रूग्णांकडून नॅान कोव्हीड रूग्णांना हा संसर्ग होवू नये यासाठी कोरोना कोव्हीड बाधित रूग्णांना महापालिकेने प्राधिकृत केलेल्या सिव्हील हॅास्पीटल आणि होरायझन प्राईम या दोन हॅास्पीटलमध्येच दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रूग्णांलयांवर साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतुदी तसेच महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी अधिनियमातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही श्री. सिंघल यांनी दिला आहे.
राज्यात 31 मार्च 2020 पासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्याचा अधिनियम निर्गमित करण्यात आला आहे. या अधिनियमाच्या खंड 2(1) अन्वये महापालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
परदेशामध्ये एकाच रूग्णालयामध्ये कोव्हीड आणि नॅान कोव्हीड रूग्णांवर उपचार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नॅान कोव्हीड रूग्णांना कोव्हीडची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी हा मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोव्हीड प्राधिकृत दोन रूग्णालयांमध्ये नॅान कोव्हीड रूग्णांना दाखल करता येणार नाही तसेच नॅान कोव्हीड रूग्णालयांमध्ये कोव्हीड बाधीतांना दाखल करता येणार नाही. त्यामुळे महापालिका हद्दीतील नॅान कोव्हीड खाजगी रूग्णालयांनी आपल्या रूग्णालयांमध्ये कोरोना बाधीत रूग्ण दाखल करता येणार नाही.
खासगी रूग्णालयांमध्ये अशा प्रकारे संशयित व निश्चित निदान झालेल्या रूग्णांकडून नॅान कोव्हीड रूग्णांमध्ये संक्रमण होवू शकते. हे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने सिव्हिल हॅस्पीटल आणि होरायझन प्राईम(खासगी रूग्णालय) ही दोन रूग्णालये कोव्हीड 19 रूग्णालये म्हणून प्राधिकृत करण्यात आलेली आहेत. या दोन रूग्णालयांशिवाय इतर कोणत्याही खासगी रूग्णालयामध्ये कोव्हीड बाधीत रूग्ण दाखल न करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी निर्गमित केले आहेत. तसेच सदर रूग्णालयांमध्ये कोव्हीड व नॅान कोव्हीड असे दोन्ही प्रकारचे रूग्ण ठेवल्याचे आढळल्यास अशा रूग्णालयांवर साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तसेच महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी अधिनियमांमधील विविध तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशा इशारा श्री. सिंघल यांनी दिला आहे.