महाराष्ट्र

राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. ९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ८ एप्रिल २०२० या आठ दिवसात राज्यातील १ कोटी ४० हजार ८२२ शिधापत्रिका धारकांना २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईही करण्यात येत आहे. ​

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु. किलो दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु. किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे १३ लाख ९६ हजार १२१ क्विंटल गहू, १० लाख ८४ हजार ३३० क्विंटल तांदूळ, तर  १२ हजार ७७८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे ४ लाख ६९ हजार २१२ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ दि. 3 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने  देण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 लाख 50 हजार 82 मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिलसोबतच मे आणि जूनमध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!